
सामना ऑनलाईन । मुंबई
कुर्ला येथील दोन पादचारी पुलांच्या बंदीने गोंधळाचे वातावरण असतानाच पालिकेने ‘परे’च्या मालाड स्थानकाचे पूर्व ते पश्चिम जोडणारे दोन पादचारी पूल गुरुवारी अचानक बंद केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे ट्विट मुंबई पोलिसांनी केले. त्यामुळे एकाच पुलावर गर्दीचा भार येणार असल्याचा इशारा मिळताच अखेर पालिकेने हा निर्णय मागे घेत हा पादचारी पूल पुन्हा खुला केला.
सीएसएमटीला लागून असलेला ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळण्याची घटना घडल्यानंतर रेल्वेने सर्व पुलांची पुन्हा झाडाझडती घेण्यास प्रारंभ केला आहे. आयआयटी तज्ञांनी मध्य रेल्वेच्या सर्व दोन पुलांचे ऑडिट पूर्ण केले असून आता त्याचा अहवाल येणे बाकी आहे. तरीही मध्य आणि पश्चिम रेल्वे कोणताही धोका पत्करण्याच्या स्थितीत नसून सर्व बांधकामांचे पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गर्दी आवरताना रेल्वे सुरक्षा बलाची कसोटी लागत असल्याने त्यात निवडणुकीसाठी लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफच्या कंपन्या बंदोबस्तासाठी गेल्याने जवानांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे 232 पुरुष तर 97 महिला जवानांचे पथक नेमण्यात आले आहे. तर आणखीन 200 जवानांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, तर मध्य रेल्वेने होमगार्डचे 200 तर महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे 70 जवान नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
विलेपार्ल्याचा पादचारी पूल तीन महिने बंद
मालाडमध्ये पालिकेने पूर्व ते पश्चिम जोडणारा एक पादचारी पूल यापूर्वीच बंद केला होता. त्यानंतर त्यांनी दुसराही पादचारी पूल दुरुस्तीकरिता शुक्रवारी अचानक बंद केला होता, मात्र मुंबई पोलिसांनी यासंदर्भात ट्विट केल्यानंतर हा पूल पुन्हा उघडण्यात आला. दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या विलेपार्ले येथील दक्षिणेकडील पादचारी पुलाचे पश्चिम दिशेचे दोन स्पॅन शनिवार, 6 एप्रिलपासून तीन महिने दुरुस्तीकरिता बंद राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.


























































