
सीमेवर वाढलेल्या तणावानंतर बीसीसीआयने आयपीएलच्या फटकेबाजीला सात दिवसांची विश्रांती देण्यात आली होती. ही विश्रांती वाढण्याचीही शक्यता होती. मात्र दोन दिवसांतच पाकिस्तानने माघार घेतल्यामुळे सुरू होणाऱ्या युद्धाला वेळेपूर्वीच विराम मिळाला आहे. त्यामुळे येत्या आठवडाअखेरीस म्हणजे 16 किंवा 17 मेपासून आयपीएलच्या पुन्हा एकदा धमाका होणार असून यासाठी परदेशी खेळाडूही आयपीएलच्या मार्गावर परतण्यासाठी सज्ज झाले आहे.
पंजाब किंग्ज प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग हे तणावाच्या वातावरणामुळे ऑस्ट्रेलियाला परतण्यासाठी दिल्ली विमानतळावरही पोहोचले होते. मात्र युद्धविरामाचे वृत्त कळताच त्यांनी विमानातून माघार घेत पुन्हा हॉटेल गाठले. ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू मायदेशी परतले असले तरी ते पुन्हा आयपीएलसाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र बंगळुरूचा वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड दुखापतीमुळे आयपीएलला येण्याची शक्यता कमीच आहे. मात्र मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, जॉश इंग्लिस, एरॉन हार्डी हे ऑस्ट्रेलियन्स हिंदुस्थानातच असल्यामुळे त्यांच्या संघांच्या चेहऱयावर आनंद उमलला आहे.
ऑस्ट्रेलियाप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचेही काही खेळाडू मायदेशी परतल्याचे वृत्त आहेत तर काही दुबई मुक्कामी असल्याचे कळले आहे. त्यामुळे तेसुद्धा पुन्हा आपापल्या संघांमध्ये दाखल होतील आणि सरावाला लागतील. बीसीसीआयने सात दिवसांचा ब्रेक घेतला असला तरी दोन दिवसांपासूनच आपल्या पुढच्या कार्यक्रमाच्या तयारी लागले आहेत.