जुनी पेन्शन द्या, नाहीतर उत्तरपत्रिका तपासणार नाही! पुन्हा दहावी, बारावी परीक्षा लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध प्रलंबित मागण्यांसाठी दहावी, बारावी परीक्षांना लक्ष्य करण्याचे हत्यार शिक्षक संघटनांनी पुन्हा एकदा उपसले आहे. राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी येत्या 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्यातील अनेक शिक्षक संघटना या संपात सहभागी झाल्या असून जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या शिक्षक संघटनांनी घेतला आहे.

राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यातच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला होता. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघतो तोच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने 21 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका न तपासण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागासोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त निघेपर्यंत शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नाही. शिवाय राज्य शिक्षण मंडळात पार पडणाऱ्या मुख्य नियामकांच्या बैठकीवरही शिक्षकांनी बहिष्कार घातला होता. इतिवृत्त आल्यावर या शिक्षकांनी वेगाने उत्तरपत्रिका तपासायला सुरुवात केली. मात्र आता पुन्हा एकदा उत्तरपत्रिका तपासणीला ब्रेक लागणार आहे.

राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केल्यास संप सुरू ठेवण्याची वेळच येणार नाही. जुनी पेन्शन योजनेची मागणी फार वर्षांपासून प्रलंबित आहे. महासंघाने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून यादरम्यान बारावीची उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्णत बंद असेल.
प्रा. मुकुंद आंधळकर, समन्वयक, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

14 मार्चपासून समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आम्ही शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचण होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे परीक्षेच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी शिक्षक पार पाडतील, पण पेपर तपासणीचे काम आम्ही करणार नाही.
> सतीश इनामदार, अध्यक्ष, मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघ

संपात सहभागी शिक्षक संघटना
राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, महाराष्ट्र शिक्षक सेना, ग्रेटर मुंबई शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, राज्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघ.

शाळांच्या वार्षिक परीक्षांनाही झळ
शाळांच्या वार्षिक परीक्षा पुढील आठवडय़ापासून सुरू होत आहेत. संपात सहभागी होण्यासाठी शाळा बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संप सुरू राहिल्यास शाळांच्या वार्षिक परीक्षेलादेखील या संपाची झळ बसण्याची शक्यता आहे. सोमवारी, 13 मार्च रोजी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची राज्य सरकारसोबत बैठक होणार असून या बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निर्णय झाल्यास संप करण्याची वेळच येणार नाही.