
पुरावा दिलाय तर चौकशी कशाला, तातडीने त्या चार वॉर्ड अधिकाऱयांना हाकला, अशी मागणी करत मुंबई पालिकेत सहाय्यक आयुक्तांच्या प्रमोशन घोटाळ्यावरून शिवसेना आमदार ऍड. अनिल परब मंत्री उदय सामंत यांच्यावर बरसले.
अनिल परब यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. पालिकेच्या प्रशासकांकडून मनमानी सुरू असल्याचे ते म्हणाले. सहाय्यक आयुक्तांची भरती एमपीएससीकडून केली जाते. परंतु प्रक्रिया पूर्ण होऊन मुलाखती घेतल्यानंतरही उमेदवारांची यादी आलेली नाही. म्हणून पालिकेने तात्पुरते सहाय्यक आयुक्त भरण्याबाबत जाहिरात काढली. कार्यकारी अभियंत्याने किमान तीन वर्षांचा कारभार पूर्ण केला असेल तर त्याला सहाय्यक आयुक्तपदी बढती दिली जाऊ शकेल अशी अट त्यात होती. परंतु सरकारने त्यांच्या मर्जीतील सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता म्हणून बढती देऊन नंतर त्यांना सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त केले, असे अनिल परब यांनी सभागृहात सांगितले.
किमान 100 लोक आहेत ज्यांनी कार्यकारी अभियंता म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पण जयदीप मोरे, उद्धव चंदनशिवे आणि सलिल तळेकर, अजय पाटणे या चौघांनी तीन वर्षांचा कार्यकारी पूर्ण केला नसतानाही त्यांना सहाय्यक आयुक्त बनवण्यात आले असे सांगून त्यांच्या नियुक्तीचे पालिकेचे आदेशच आमदार परब यांनी सभागृहाला दाखवले. हे चौघे सरकारचे जावई आहेत का असा जाबही त्यांनी विचारला. या चुकीच्या बढत्या रद्द करून या चौघांना त्यांच्या मूळ पदावर तातडीने पाठवण्यात यावे अशी मागणी अनिल परब यांनी केली. तसेच ज्यांनी या बढत्या दिल्या त्यांच्यावरही कारवाई करावी असे ते म्हणाले. आमदार सचिन अहिर, जनता दलाचे कपिल पाटील यांनीही परब यांच्या मागणीला दुजोरा दिला.

























































