
सामना प्रतिनिधी । परभणी
७ डिसेंबरपर्यंत महावितरणने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्वरीत रोहित्र उपलब्ध करुन द्यावेत आणि वीजपुरवठा सुरुळीत चालू ठेवावा, तसेच प्रलंबित कामे येत्या ८ दिवसात मार्गी लावावेत, अन्यथा परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकरी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार आहेत, असा इशारा अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात खासदार संजय जाधव यांनी दिला आहे.
आज १ डिसेंबर रोजी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात समक्ष भेट घेऊन खासदार संजय जाधव यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे. या निवेदनात परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. आत्तापर्यंत आपल्या विभागात २५० रोहित्र नादुरुस्त असल्याची प्रतीक्षा यादी आहे. निष्क्रीयतेमुळे ही यादी संपण्याऐवेजी वाढत चालली आहे. याकडे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना वेळेवर वीज जोडणी मिळत नाही, रोहित्र मिळत नाही, ७ डिसेंबरपर्यंत महावितरणने नादुरुस्त रोहित्र तात्काळ दुरुस्त करावीत, या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा न निघाल्यास खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात हाजरो शेतकरी मुंबई येथील वीज कंपनीच्या कार्यालयास घेरावो घालणार आहेत. महावितरणचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत चालला असून सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत रोहित्र दुरुस्त न केल्यास ७ डिसेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांसोबत मुंबई येथील महावितरणच्या कार्यालयावर जाणार असून त्यांच्या परिणामास महावितरण जबाबदार राहिल, असा इशारा खासदार जाधव यांनी दिला आहे.
परभणी विभागातील कृषी पंपाच्या कामासाठी ८ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज दिले होते. त्या कामाच्या निविदाही निघाल्या होत्या. त्या लगेच रद्द करण्यात आल्या. परिणामी अनेक कामे खोळंबून राहिली. फेज दोनचे काम पूर्ण झाले असून अद्याप फेज एकचे काम अर्पण आहे. या महावितरणच्या गलथान कारभाराकडे लक्ष वेधण्यात आले. महावितरण गांभिर्याने लक्ष देत नसल्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत आहे. आठ दिवसात प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा ७ डिसेंबर रोजी मुंबर्ई येथील प्रकाशगड कार्यालयास घेराव घालण्यात येईल, असा इशारा दिला आहे.































































