सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी शहरातील आयडीबीआय या बँकेस तालुक्यातील तीन गावे दत्तक देण्यात आली असताना आणि दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर असताना बँक पीककर्ज वाटप करण्यास विलंब करत आहे. हे पीककर्ज त्वरीत वाटप व्हावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या बँकेत आज ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात बुधवार, ९ जुलै रोजी पर्यंत कर्जप्रकरणी निकाली काढण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी दिले.
परभणी तालुक्यातील धारणगाव, साटला व गोविंदपूरवाडी ही तीन गावे आयडीबीआय बँकेच्या परभणीच्या मुख्य शाखेला दत्तक आहेत. सध्या पेरणीचे दिवसही संपत आले आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशा समयी बँकेने पीककर्ज वाटप करणे गरजेचे आहे. या बँकेने तिन्ही गावातून केवळ कर्ज प्रकरणे स्वीकारली असून त्यावर कारवाई सुरु असल्याचे कारण समोर केले जात आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी किशोर ढगे, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोंढे, रामभाऊ आवरगंड, धोंडीराम खटींग, अमोल जवंजाळ, निलेश डुकरे, गोविंद डोंबे, किरण डुकरे, संतोष डुकरे, रंगनाथ चोपडे, किरण जवंजाळ, नागेश जवंजाळ, भारत डुकरे यांनी बँकेत ठिय्या आंदोलन करून पीककर्जाच्या मागणीकडे बँकेचे लक्ष वेधले. बँकेच्या शाखेला टाळे ठोकण्यासाठी कार्यकर्ते सरसावले, तेव्हा जिल्हा अग्रणी बँकेचे मॅनेजर हट्टेकर यांनी या बँकेच्या शाखेत धाव घेऊन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांच्या कार्यालयात बँक व शेतकरी यांच्यात चर्चा घडून आणली. पीककर्जा संदर्भात बुधवार, ९जुलै रोजी कर्जप्रकरणे निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले आंदोलन तुर्त स्थगित केले आहे.































































