वरसोली कोळी समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अलिबाग तालुक्यातील वरसोली कोळी समाजाची जमीन विकून मल्हारी मार्तंड मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मात्र या मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याने मंदिराचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. कोळी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व सहायक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. यासाठी वरसोली कोळी समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी समाजातर्फे करण्यात आली आहे.

वरसोली येथे मल्हारी मार्तंडचे मंदिर आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी देवस्थानची असलेली जमीन करोडो रुपयात विकली होती. त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार देवस्थान ट्रस्ट मार्फत करण्याचे काम 2012 साली सुरू झाले. हे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे ठेकेदारास सांगितले होते. मात्र आज सात वर्षे उलटले तरी मंदिराचे काम अपूर्णावस्थेत आहे.

याबाबत समाजातर्फे सहायक धर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र तक्रार दाखल करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे कोळी बांधव यांनी शेवटचे अस्त्र आमरण उपोषणाचे उगारले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 29 डिसेंबर पासून सारा गाव आमरण उपोषणास बसला आहे. देवस्थान मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी कोळी समाजाच्या बांधवांची आहे. त्यामुळे जोपर्यत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.