
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातून वाहणाऱ्या लहुकी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करावा, या मागणीसाठी बदनापूर तालुक्यातील वरूडी येथील तरूणांनी पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. वरूडी येथील नवनाथ आत्माराम शिंदे, राम शिंदे, सावळाहरी शिंदे, गजानन शिंदे, कृष्णा शिंदे, आबाजी शिंदे, शंकर शिंदे, रमेश शिंदे, बद्रीनाथ शिंदे या तरुणांनी अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी हे आंदोलन केले.
या तरूणांनी 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिाकारी, उपविभागीय अधिकारी व बदनापूरच्या तहसीलदारांना निवेदन दिल होते. 28 डिसेंबरपर्यंत वरूडी येथील लहुकी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा बंद न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला होता. वाळू उपसा व अवैध वाहतूक न थांबल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता वरूडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
लहुकी पात्रातील वाळू उपसा मागील दोन वर्षांपासून सुरू असून तहसील कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयास याबाबत वारंवार माहिती दिल्यानंतर तात्पुरती कारवाई करण्यात येते. त्यानंतर वाळू माफिया पुन्हा वाळू तस्करीला सुरुवात करतात. त्यातून दोन वर्षांत शासनाचा जवळपास 10 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची शक्यता असल्याचे तरुणांनी सांगितले. तसेच अवैध वाळू वाहतुकीमुळे गावातील रस्ता खडडेमय झाला असून या रस्त्यावर अपघाताचा धोकाही वाढला आहे.
याबाबत वरुडी गावकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊनही उपयोग होत नसल्यामुळे त्यांनी थेट टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हे तरुण पाण्याच्या टाकीवर केरोसिन घेऊन चढले. वाळूची तस्करी व अवैध वाहतूक थांबत नसल्याने त्यांनी टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रमेश मुंडलोक, नायब तहसीलदार दावगावकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक भागवत वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना टाकीवरून खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र, आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. लेखी आश्वासन द्या, ताबडतोब वाळू उपसा व वाहतूक बंद करा, या मागणीवर तरुण ठाम होते.
अखेर दोन तासानंतर तहसीलदार रमेश मुंडलोक व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त पथक नियुक्त करून लहुकी पात्रातील वाळू उपसा व वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तरुणांनी आंदोलन मागे घेतले.



























































