Air India Plane Crash – अहमदाबाद विमान अपघातात ब्लॅक बॉक्स झाला खराब, तपासासाठी अमेरिकेत पाठवणार

अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाचा अपघात नेमका कसा झाला हे समजण्यासाठी थोडा उशीर होईल. कारण या विमानातला ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे. त्यामुळे या बॉक्समधील डेटा मिळवणे शक्य होत नाहिये. त्यासाठी हा ब्लॅक बॉक्स आता अमेरिकेतील नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) च्या वॉशिंग्टन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

12 जून 2025 रोजी, एअर इंडिया फ्लाइट AI-171 अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 36 सेकंदातच कोसळले होते. या अपघातात 241 प्रवासी आणि 10 कर्मचारी मिळून एकूण 274 जणांचा मृत्यू झाला होता. हे विमान मेघानी नगर येथील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृह आणि रहिवासी इमारतींवर कोसळले होते. अपघातापूर्वी पायलट कॅप्टन सुमीत सभरवाल यांनी “मेडे कॉल” दिला होता, जो शेवटचा संदेश ठरला होता.

या अपघातानंतर दोन दिवसांनी ब्लॅक बॉक्स म्हणजेच कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) सापडला होता. पण विमानाला आग लागल्यामुळे आणि मोठे नुकसान झाल्यामुळे त्यातील माहिती मिळवणे शक्य होत नाहिये. या बॉक्समधून उड्डाणाच्या शेवटच्या क्षणांबद्दल की उंची, वेग आणि पायलट्समधील संवाद याची माहिती मिळू शकते, जी अपघाताचे कारण समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाची आहे अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

हिंदुस्थानच्या विमान अपघात चौकशी विभागाने (AAIB) चौकशी सुरू केली आहे आणि यामध्ये अमेरिकन, ब्रिटिश आणि बोईंगचे तज्ज्ञही सहभागी आहेत. ब्लॅक बॉक्समधील डेटा NTSB च्या सहाय्याने बाहेर काढला जाणार असून, हिंदुस्थानचे अधिकारीही या प्रक्रियेमध्ये उपस्थित असतील जेणेकरून सर्व नियमांचे पालन होईल.