नगर महापालिकेच्या अर्थसंकल्पाला अखेर मुहूर्त, गुरुवारी सादर करणार बजेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनपाच्या 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या गुरुवारी (दि. 18) स्थायी समितीची अर्थसंकल्पीय सभा होत आहे. यावेळी प्रशासनाकडून स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी या सभेचा अजेंडा काढला असून, सकाळी 11 वाजता ही सभा होणार आहे. 20 फेब्रुवारीनंतर अर्थसंकल्प सादर होत असल्याने यंदाही करवाढ टळलेली आहे. गतवर्षी शहरासह जिह्यात कोरोनाचे संकट होते. त्यामुळे मनपाचा अर्थसंकल्प थेट ऑक्टोबरमध्ये मंजूर करण्यात आला होता. मनपा प्रशासनाने 715 कोटी 51 लाखांचा अर्थसंकल्प महासभेला सादर केला होता. त्यास महासभेने वाढीव तरतुदींसह मंजुरी दिली होती. त्यामध्ये महापौरांसह पदाधिकाऱयांसाठी पाच कोटी 15 लाखांच्या विकासनिधीची तरतूद केली होती. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मनपाची आर्थिक स्थितीही डबघाईला आलेली आहे. त्यामुळे यंदा अर्थसंकल्प किती रुपयांचा असणार, याकडे लक्ष लागले आहे.

नवे आयुक्त अन् नवे सभापती

n शंकर गोरे हे मनपा आयुक्तपदी काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले आहेत. तसेच स्थायी समितीच्या सभापतिपदी अविनाश घुले यांची नुकतीच निवड झालेली आहे. घुले यांनी यापूर्वीही स्थायी समितीचे सभापतिपद भूषविलेले आहे. मात्र, यंदा आयुक्त गोरे व सभापती घुले यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.