
बिहार राज्यातील घोडासहन येथील घड्याळ चोरीतील कुप्रसिद्ध टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक केली आहे. आरोपींकडून 10 लाख 62 हजार रुपयांच्या मुद्देमालासह 100 महागडी घड्याळे जप्त केली आहेत. या टोळीतील आठजणांना ताब्यात घेतले असून, एकजण फरार आहे. अवघ्या बारा दिवसांतच स्थानिक गुन्हे शाखेने येथील सचिन वॉच दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सुरेंदर जयमंगल दास (वय – 40), रियाज नईम अन्सारी (वय – 40), पप्पू बिंदा गोस्वामी (वय – 44), राजकुमार चंदन साह (वय – 20), राजुकुमार बिराप्रसाद (वय – 45), नईम मुन्ना देवान (वय – 30), राहुलकुमार किशोरी प्रसाद (वय – 26), गुलशनकुमार ब्रह्मानंद प्रसाद (वय – 25) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. संजय लालचंद जैन (रा. गुरुद्वारा रोड, कोपरगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
संजय जैन यांचे कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी नावाचे घड्याळाचे दुकान आहे. फिर्यादी दि. 18 एप्रिल रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील विविध कंपनींची घड्याळे घरफोडी करून चोरून नेली होती. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेस या गुन्ह्यांचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करून तपासासाठी रवाना केले.
पथक बुध्वारी (दि. 30) कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना, सदरचा गुन्हा बिहारमधील घोडासहन येथील सुरेंद्र दास याने सात साथीदारांसह केला असून, ते सध्या पुण्यातील शिरूर परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने शिरूर येथे संशयितांचा शोध घेऊन वरील आरोपींना ताब्यात घेतले. पथकाने त्यांच्याकडून 9 लाख 81 हजार रुपये किमताचे टायटन, रागा टायटन, ट्रायमॅक्स कंपनीची 10 घड्याळे, दोन वायफाय राऊटर, 7 मोबाईल, असा एकूण 10 लाख 62 हजार रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पथकाने आरोपींकडे चौकशी केली असता, सुरेंद्र दास याने आपल्या साथीदारांसह कोपरगाव शहरातील एका घड्याळाच्या शोरूममधून चोरी केली असून, सदरची चोरी करताना त्यांच्याकडील मोबाईल व राऊटरचा वापर केल्याची माहिती सांगितली. तसेच चोरीची काही घड्याळे ही मोबीन देवान याच्या मार्फत मुकेश शहा याला सदरची घड्याळे ही चोरीची असल्याचे सांगून ती कमी किमतीत विक्री केली. काही घड्याळे मोबीन देवान याच्याकडे असल्याचे आरोपी दास याने सांगितले.
ताब्यातील आरोपींना जप्त करण्यात
आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले. कोपरगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीखक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.