
गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या पहाटेच्या सुमारास जेरबंद झाला. पिंजऱ्याला दिलेल्या धडकेत त्याला दुखापत झाली आहे.
सुगाव बुद्रुक परिसरात सलग काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. शेळ्या, कोंबड्या आणि पाळीव जनावरांवर हल्ले होऊन नुकसान होत होते. दिवसाढवळ्याही बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. शाळकरी मुलेही भीतीमुळे घराबाहेर पडायला घाबरत होती. परिसरातील वाढती धास्ती लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सौरभ देशमुख यांनी वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मानव जीवनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर देशमुख यांच्या शेताजवळ तसेच इतर दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. मंगळवार (4 ऑक्टोबर 2025) पहाटे वनरक्षक रोहिदास परते, ऋषिकेश देशमुख आणि सिद्धांत देशमुख यांच्या सहकार्याने बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. सुमारे तीन वर्षांचा नर बिबट्या सध्या सुगाव बुद्रुक येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत उपचारासाठी हलविण्यात आला आहे. परिसरात अजून दोन बिबटे फिरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, रात्री शेतात एकटे जाणे टाळण्याचे तसेच हालचाल दिसताच तत्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे.

























































