
ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोगांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी इन्फोसिस कंपनीने उभारलेली अत्याधुनिक ‘सायन्स लॅब बस’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रे खुर्द येथे दाखल झाली. विज्ञानाची अद्भुत सफर अनुभवण्यासाठी जिल्हा परिषद शाळा धोत्रे खुर्द, तसेच तुफानवस्ती येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या बसला भेट दिली.
या अभिनव उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि लोकल फंड सहायक संचालक रमेश कासार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पुढाकार घेतला. ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रत्यक्ष प्रयोग दाखवून नवी दृष्टी देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
सायन्स लॅब बसमध्ये प्रवेश करताच मुलांच्या डोळ्यांमध्ये उत्सुकतेची चमक दिसू लागली. डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रयोग, स्वतः हाताळण्याची उपकरणे, कार्यप्रणाली दाखवणारे मॉडेल्स आणि विज्ञानातील गुंतागुंतीच्या संकल्पनांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण, यामुळे विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा मनसोक्त आनंद घेतला. इतके प्रयोग प्रत्यक्ष हाताळून बघण्याची ही पहिलीच वेळ, हा अनुभव आम्ही आयुष्यभर विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.
शिक्षकांच्या मते, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची ओढ, आत्मविश्वास आणि उत्सुकता अधिक वृद्धिंगत झाली असून, विज्ञानविषयक ज्ञानात भर पडली आहे. ग्रामीण भागातील मुलांना प्रयोगशाळेचा थेट अनुभव देणारी ही बस म्हणजे खऱ्या अर्थाने ‘चालती-बोलती विज्ञानशाळा’ ठरत आहे.
पालकांनीही इन्फोसिसच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाची नवसंकल्पना गावागावांत पोहोचवणारी ही विज्ञान बस परिसरातील मुलांसाठी विशेष आकर्षण बनली आहे. इन्फोसिसच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडणारा नवा मार्ग उपलब्ध झाला असून, विद्यार्थ्यांच्या विज्ञान स्वप्नांना नवी उंच भरारी मिळत आहे.



























































