
नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवार येथील गुरूराज पेट्रोल पंपावर तीन मद्यपींनी पेट्रोल पंप मॅनेजरची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात दहेगाव बोलका तालुका कोपरगाव येथील रहिवासी गुलाम भोजराज बापूराव घनघाव (40) यांचा मृत्यू झाला.
जुन्या मुंबई नागपूर महामार्गावर संवत्सर शिवारात गुरुराज पेट्रोल पंप आहे. या पंपाचे भोजराज घनगाव हे मॅनेजर होते. कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील जुना मुंबई नागपूर रोड हा रात्री निर्जन असतो. यावेळी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अमोल धोंडीराम मोहीते (25) हे गुरुराज पेट्रोलपंप येथे ड्युटीवर होते. यावेळी तीन अनोळखी इसम पल्सर मोटार सायकल क्रमांक एमएच 17 सीडब्ल्यु 9104 वर आले. त्यांच्यापैकी दोन इसम हे मोटार सायकलवर वरुन खाली उतरले आणि फिर्यादीस धक्काबुक्की करुन त्याच्या कानाखाली मारली. यावेळी मॅनेजर भोजराज बापुराव घनघाव यांनी मध्यस्ती करत तु माझ्या माणसाला मारहाण का केली असे विचारले.
याचा राग आल्याने हल्लेखोरांनी कमरे जवळुन एक धारदार चाकु काढुन, मॅनेजर भोजराज घनघाव यांच्यावर चाकुने पोटात व खांद्यावर वार केले. यानंतर हल्लेखोर मोटरसायकलवरून पळून गेले. यावेळी घनघाव यांना उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशलिटी शिर्डी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पेट्रोल पंपावरील कर्मचारी अमोल मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात हल्लेखोराविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला पोलीस विभागीय अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक रामराव ढिकले पोसई रोहिदास ठोंबरे व पोसई भरत दाते यांनी भेट दिली.
याप्रकरणी काही तासातच नाशिक व शिर्डी येथून दोन संशयितांना पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून रात्री उशिरा ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले करीत आहे.


























































