iPhone 15 Pro Max विकत घेण्यासाठी 17 तास रांगेत उभे राहावे लागले, दिल्ली मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर लांबच लांब रांगा

अ‍ॅपलने iPhone 15 बाजारात आणला असून या फोनच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. अ‍ॅपल स्टोअरव्यतिरिक्त अन्य दुकानांमध्येही ग्राहक हा फोन विकत घेऊ शकतात. मात्र अनेकांचा आग्रह हा अ‍ॅपल स्टोअरमधूनच विकत घेण्याचा असून मुंबई आणि दिल्लीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे वृत्त आहे. हिंदुस्थानात दोनच ठिकाणी अ‍ॅपल स्टोअर सुरू झाले असून यातील एक मुंबईत आहे. या दुकानातून iPhone 15 च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. कालपासूनच या दुकानाबाहेर ग्राहकांनी रांगा लावण्यास सुरुवात केली आहे. iPhone 15 सगळ्यात पहिले आपल्याला हातात पडावा आपल्याला तो मिरवता यावा यासाठी ही धडपड सुरू आहे. जे चित्र पूर्वी अमेरिकेमध्ये पाहायला मिळायचे तेच चित्र आता हिंदुस्थानातही पाहायला मिळत आहे.

मुंबईतील अ‍ॅपल स्टोरमध्ये iPhone 15 विकत घेण्यासाठी आलेल्यांमध्ये अहमदाबादहून आलेल्या व्यक्तीचाही समावेश होता. 21 तारखेच्या संध्याकाळी या माणसाने संध्याकाळी 3 वाजता रांग लावली होती. सगळ्यात पहिला फोन याच माणसाच्या हाती पडला आहे. एक व्यक्ती बंगुळुरूहून विमान पकडून पहाटे मुंबईत पोहोचला होता. फक्त हे दोघेच नाही तर अनेकजण आहेत जे इतर राज्यांतून किंवा इतर जिल्ह्यांमधून फक्त iPhone 15 विकत घेण्यासाठी मुंबईला आले आहेत.

iPhone 15 मालिकेत चार नवीन मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे. iPhone 15 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. तर iPhone 15 Plus व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपयांपासून सुरू होते. प्रो वेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन खूप महाग आहे. iPhone 15 Pro ची किंमत 1,34,900 रुपयांपासून सुरू होते. तर iPhone 15 Pro Max ची किंमत 1,59,900 रुपयांपासून सुरू होते. Apple Store वर तुम्हाला अनेक ऑफर्स मिळत आहेत. नवीन फोनवर तुम्ही 6 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर 5 हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे. iPhone 15 Pro सीरीजवर 6,000 रुपयांची सूट आहे. ही ऑफर HDFC बँकेच्या कार्डांवर उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही हा फोन नो-कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करू शकता. जर ग्राहकाने हा फोन प्री-ऑर्डर केला असेल तर त्याला रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. ज्यांनी आगाऊ नोंदणी केली नसेल त्यांना मात्र रांगेत उभे राहून हा फोन विकत घ्यावा लागणार आहे.