Mayday Mayday Mayday, No power… Going down; दुर्दैवी विमानाचे वैमानिक सुमीत सभरवाल यांचा शेवटचा संदेश

अहमदाबाद येथील विमान अपघातात 275वर प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने लंडनकडे टेकऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच मुख्य पायलट सुमीत सभरवाल यांनी एअर ट्रफिक पंट्रोलला (एटीसी) महत्त्वाचा मेसेज पाठवला होता. या पाच सेकंदाच्या मेसेजमध्ये सभरवाल यांनी mayday mayday mayday No power… Going down (मेडे मेडे मेडे… पावर कमी होत चालली आहे, विमान उडत नाही, आम्ही आता वाचणार नाही), असे म्हटले होते.

विमान धोक्यात असल्यास वैमानिक हा संदेश पाठवतो. अहमदाबाद येथे विमान कोसळत असताना वैमानिक सभरवाल यांनी हा मेसेज पाठवला होता. विमान आकाशात झेपवण्यासाठी इंजिनमधून पुरेशी शक्ती मिळत नाही, असे सभरवाल हे त्यांच्या मेसेजमधून सांगत होते आणि काही क्षणातच शेकडोंचा बळी घेणारी ही भीषण दुर्घटना घडली.

अपघाताचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

एअर इंडियाचा अपघात होतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱया युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. आर्यन असे या युवकाचे नाव आहे. तो नुकताच गावावरून आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता. नातेवाईकांचे घर विमानतळाजवळच आहे. त्याने मोबाईल कॅमेऱ्यात अपघाताचे चित्रण केले. व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि विमान अपघाताची वेळ इतकी अचूक कशी साधली गेली याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, उत्सुकतेपोटी आपण व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो. विमान घराजवळून जात असल्याचे मित्रांना दाखवायचे होते, असे त्याने सांगितले.

‘मेडे’ फ्रेंच शब्द

मेडे हा फ्रेंच शब्द आहे. विमान धोक्यात असल्याचा संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वैमानिक या शब्दाचा वापर करतात. धोक्याचा तांत्रिक बिघाड किंवा गंभीर अपघाताची शक्यता असेल तर वैमानिक मेडे मेडे संदेश पाठवतात.

शक्ती न मिळण्याची कारणे

विमानाला झेपावण्यासाठी शक्ती न मिळण्याची जगभरात वेगवेगळी कारणे सांगितली जातात. विमानाची दोन्ही इंजिने बंद पडली किंवा इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय बंद झाला की विमान आकाशात झेप घेत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सापडल्याने अपघाताची नेमकी कारणे समोर येतील.