पै-पै जमा करून बायकोला अमेरिकेला पाठवलं,अमेरिकेत जाताच नवऱ्याला सोडून दिलं

आपल्या बायकोसोबत अमेरिकेला जायचं भरपूर पैसा कमवायचं आणि आयुष्य सुखात जगायचं अशी स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाला जबर धक्का बसला आहे. या तरुणाने म्हटलंय की त्याची बायको त्याच्याकडून पैसे घेऊन अमेरिकेला गेली आणि अमेरिकेला पोहोचताच फोन करून तिने सोडचिठ्ठी दिली. हितेंद्र देसाई असं या तरुणाचं नाव असून तो अहमदाबादचा रहिवासी आहे. हितेंद्र हा 32 वर्षांचा असून त्याच्या बायकोचं नाव याशा पटेल आहे. हे दोघे एकमेकांना 2013 पासून ओळखतात. हितेंद्र आणि याशा विद्यार्थी असतानापासून दोघे एकमेकांना ओळखत होते आणि दोघे एकमेकांवर प्रेम करत होते.

हितेंद्र आणि याशा हे वेगळ्या जातीचे आहेत. 28 मार्च 2017 रोजी त्यांनी लग्न करायचं ठरवलं होतं. हितेंद्रने म्हटलंय की त्याच्या आणि याशाच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला होता. हा विरोध झुगारून त्यांनी लग्न केलं होतं. घरच्यांपासून लग्न लपवण्यासाठी दोघे वेगळे राहात होते. याशा पटेल हिला अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेले आहे. यामुळे तिने अमेरिकेत जायचा निर्णय घेतला होता. तिथे जाताच तुलाही बोलावून घेईन असं याशाने हितेंद्रला सांगितलं होतं. हितेंद्रने याशाला 5 हजार डॉलर्सही दिले होते. याशा अमेरिकेला गेल्यानंतर ती जवळपास 10-15 दिवस हितेंद्रच्या संपर्कात होती. मात्र नंतर तिने हितेंद्रला फोन करण बंद करून टाकलं.

यानंतर हितेंद्रने याशाच्या पालकांची भेट घेतली होती. तिच्या पालकांनी हितेंद्रला घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला होता. हितेंद्रने याला नकार दिला होता. फेब्रुवारी 2020 मध्ये हितेंद्रला कळाले की याशा हिंदुस्थानात आली असून तिने परत लग्न केलं आहे. प्रचंड दु:खी झालेल्या हितेंद्रने याशाशी संपर्क साधण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र याशाने प्रतिसाद न दिल्याने अखेर हितेंद्रने याशाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याशाविरोधात फसवणुकीची, एकापेक्षा जास्त लग्न केल्याची तक्रार दाखल केली आहे.