नगर – उगाच फिरणाऱ्या 1700 जणांवर कारवाई, वाहनंही केली जप्त

संचारबंदी लागू असताना अनेक जण बाहेर फिरत असल्याने नगर शहरात पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. नगर शहरामध्ये सुमारे दोनशेहून अधिक वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. पोलिसांनी 1700 जणांना विरुद्ध कारवाई केली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने सर्व काही ठप्प आहे. मात्र, अशाही काळात विविध कामांचे निमित्त करून रस्त्यावर फिरणारे आहेतच. अशाप्रकारे जिल्ह्यात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या सुमारे 1700 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करून खाकीचा प्रसाद दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात संचारबंदीचा आदेश लागू केल्यानंतर जिल्ह्यात केवळ अत्यावश्‍यक सेवा वगळता बाकी सर्व काही ठप्प ठेवण्यात आले आहे. दवाखाने, किराणा, भाजीपाला अशा जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी-विक्री होत आहे. खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत.

नगर शहरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: रस्त्यावर येऊन लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाईसुद्धा केली, तरीही लोक घरी राहण्यास तयार नसून अजूनही रस्त्यावर येत आहे. विनाकारण रस्त्यावर आल्यानंतर त्यांना पोलिसी खाक्‍याला सामोरे जावे लागत आहे. नगर शहरात आतापर्यंत एक हजार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सुमारे सातशे लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

नगर शहरात आतापर्यंत सुमारे एक हजार 700 जणांविरुद्ध कारवाई केली आहे. कोरोना टाळण्यासाठी नागरिकांनी घरात बसावे. बाहेर पडल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
– संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक, नगर

आपली प्रतिक्रिया द्या