
परतीच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱयांना शेतात उभ्या पिकांना जीवदान तर देता आले नाहीच; दुसरीकडे काढून ठेवलेली पिकेही हातची गेली आहेत. जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले असले तरी दुसरीकडे प्राथमिक स्तरावर जिह्यामध्ये 43 हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. येत्या चार दिवसांत पंचनामे पूर्ण होणार आहे.
नगर जिह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे खरीप हंगाम बऱयापैकी वाया गेला असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शेतातील मका, सोयाबीन यांसारख्या पिकांना फटका बसला आहे. अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे पाणी साठले आहे. उभी असलेली पिके आडवी झाली. जिह्यात सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून, अतिवृष्टीची नोंद झालेल्या मंडळांत आधी पंचनामे केले जात आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका शेवगाव, पाथर्डी, कर्जत तालुक्यांना बसला आहे. जिह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात सलग 20 दिवस पाऊस झाला. त्यामुळे खरिपांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मागील आठवडय़ात प्रचंड पाऊस झाला.
ऑक्टोबर महिन्यात शेवगाव, पाथर्डी, कर्जत या तीन तालुक्यांतील 216 गावांतील 63 हजार शेतकऱयांच्या 43 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पाथर्डी तालुक्यात 33, कर्जत तालुक्यात 70, तर शेवगाव तालुक्यात 113 गावांना या अतिपावसाचा फटका बसला. यानंतरही 14 व 15 ऑक्टोबरला जिह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र आणि पावसाने प्रभावित शेतकरी व गावांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळांतच पंचनामे
– 3 आक्टोबरपर्यंत वरिष्ठ पातळीवर अहवाल मागितला होता. मात्र, 15 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही कृषी विभागाकडे अहवाल आलेला नाही. आताही ज्या भागात स्वयंचलित हवामान केंद्रातील नोंदीनुसार अतिवृष्टी (65 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद) झाली आहे. त्याच महसूल मंडळांत पंचनामे केले जात आहेत. लवकरात लवकर भरपाई देण्याची शेतकऱयांची मागणी आहे.





























































