नगर- बँक कर्मचाऱ्यांचा संप! निदर्शने, मोर्चा, जिल्हाधिकारी यांना निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या द्विपक्षीय कराराला आयबीएकडून होत असलेल्या विलंबामुळे बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे हा करार लवकरात लवकर करण्यात यावा यासाठी आयबीएचे लक्ष वेधण्यासाठी बँकांमधील अग्रणी युनाइटेड फोरम ऑफ बँक्स युनिअन्सने दिनांक 31 जानेवारी व 01 फेब्रुवारी रोजी दोन दिवसाच्या बँक बंदचे आवाहन केले आहे.

नगर शहरात या प्रसंगी यूको बँक चितळे रोड येथे बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी याप्रसंगी कॉ.उल्हास देसाई मार्गदर्शन करताना म्हणाले की बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या द्विपक्षीय कराराची मुदत 31 ऑक्टोबर 2017 ला संपली व 01 नोव्हेंबर 2017 पासून नवीन वेतन श्रेणी लागू व्हावयास होती. यासाठी संघटनांनी मुदत संपण्यापूर्वीच आपल्या मागण्या आयबीएला सादर केल्या होत्या. परंतु आईबीए ने अत्यंत संथ गतीने वाटाघाटीस सुरुवात केली व आज 27 महिने पूर्ण होऊन सुद्धा कोणताही निर्णय झालेला नाही.

वाटाघाटीच्या पहिल्या सभेत आयबीएने बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना केवळ 2 टक्के पगारवाढ सुचवून बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांची एक प्रकारे थट्टा केली. बँक्स संघटनांनी त्याचा ताबडतोब निषेध नोंदवला व निदर्शने केली. परंतु आशावादी बँक संघटनांनी विश्वाटस ठेवून कोणतेही संघर्षाचे पाऊल उचलले नाही. तरीही आईबीएने आपली भूमिका ताठर ठेवून वेळकाढूपणा अवलंबविला व कोणत्याही परिस्थितीत मागण्याप्रमाणे वेतनवाढ देता येणार नाही असा सूर लावून धरला. त्यासाठी बँक तोट्यात असल्याची सबब पुढे रेटण्यात आली. सद्य परिस्थितीत सर्व बँकांचा ढोबळ नफा मुबलक असून थकीत व बुडीत कर्जांमुळे कराव्या लागणाऱ्या तरतुदीमुळे तसेच बुडीत कर्जे निकाली काढण्यासाठी वळविण्यात येण्याऱ्या नफ्यामुळे बँकांना तोटा झालेला दिसूनयेतो. खऱ्यात अर्थाने हि थकीत व बुडीत कर्जेहे देशातील मोठ्या भांडवलदार व उद्योगपतींकडे असून सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई ना करता सर्रास एक प्रकारे त्यांना कर्जमाफीच देत आहे. ही जनतेची पैशांची लूटच आहे. बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांची वेतनवाढही दर 5 वर्षांनी होत असून ती सन्मानपूर्वक व स्वाभिमानाने मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. परंतु आयबीएने वाटाघाटीची केलेली सुरवात हे अत्यंत हीन भावनेने केली असून वाटाघाटीसाठी कोणताही प्रतिसाद देत नसल्याने आज संपाचे शस्त्र उगारण्यासाठी आम्हाला भाग पडल्याचे नमूद करण्यात आले.

कॉ. सुनिल उदरभरे यांनी उपस्थितांना संबोधित करतांना नेत्यांनी जाणीव करून दिली कि गेल्या काही दिवसात बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांुनी जे काही संप केलेत ते आमच्या पगारासाठी कधीच नव्हते तर ते देशातील बेरोजगार,महागाई, थकीत व बुडीत कर्जविषयी वसुलीसाठी सरकारने कायदे करून त्यांची कडक काटेकोरपणे अंबलबजावणी करावी व बँकांना तसे अधिकार द्यावे, असंघटित कामगारांना संरक्षण द्यावे, सरकारचे कामगारविरोधी धोरणे व त्यासंदर्भात नवीन आणण्यात येणारे नवीन कायदे, बँकांचे खासगीकरण, विलीनीकरण यांच्या विरोधात, खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करावे यासाठी व इतर सामाजिक जनतेच्या हिताच्या मागण्यांसाठी होते. त्यामुळे जनतेने बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांविषयी गैसमज करून घेऊ नये असे ठासून सांगितले. जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करीत त्यांनी आमच्या संपाला पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले.

भाषणानंतर कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी काऱ्यालयावर नेण्यात येऊन त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. सभेला मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. 01 फेब्रुवारी 2020 रोजी स्टेट बँक लालटाकी याठिकाणी निदर्शने आयोजित केले असून सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.