रस्त्यांच्या कामासाठी ठेकेदाराला दरवाढ न देण्याचा निर्णय, नगर शहरातील 10 कोटींच्या निधीतील रस्त्यांचा पेच कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरातील दहा कोटींच्या निधीतून करण्यात येणाऱया रस्त्यांची कामे रखडलेली असून, याला जबाबदार कोण, असा प्रश्न शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित केला, तर महापालिकेने संबंधित ठेकेदाराला दरवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे कधी मार्गी लावणार, याबाबतचा पेच निर्माण झाला आहे.

नगर शहरातील दहा कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, परेश लोखंडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मनपा आयुक्त पंकज जावळे, उपायुक्त यशवंत डांगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पालवे, ठेकेदार रसिक कोठारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री निधीतून 2017 साली शहरातील रस्त्यांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तो निधीही तत्काळ मिळाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले होते. यात शहरातील कापडबाजार, नवी पेठ, चितळे रोड, दिल्लीगेट, जुनी महानगरपालिका, आनंदीबाजार, घुमरे गल्ली, लक्ष्मीबाई कारंजा तसेच माळीवाडातील काही भाग अशा रस्त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. मात्र, आज 5 वर्षे उलटून गेली तरीही या रस्त्यांची कामे झाली नाही. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाला जाग येऊन चितळे रोडचे काम सुरू करण्यात आले होते. ठेकेदाराने दहा कोटींच्या व्यतिरिक्त आणखी चार कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. यामध्ये निविदेच्या 30 टक्के रुपये, तसेच 2 कोटी रुपये भाववाढीचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला होता. महापालिकेची सध्याची परिस्थिती पाहता तेवढी रक्कम देऊ शकत नाही, अशी चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली.

नगरसेवक बोराटे, कदम, लोखंडे यांनी या कामाला दिरंगाई झालेली आहे. जनतेचा रोष तीक्र आहे. त्यामुळे हे काम न करण्यामागे कोणाचा काय हेतू होता, हे पुढे आले पाहिजे. या रस्त्यांची कामे तत्काळ करून द्या, बाकी काही सांगू नका, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी आयुक्त जावळे यांनी महानगरपालिकेची सध्याची परिस्थिती पाहता आपण वाढीव रक्कम देऊ शकणार नाही. इस्टिमेटप्रमाणे जे काही पैसे होतील ते देण्यास तयार आहे; अन्यथा ही कामे रद्द करून ती पुन्हा शासनाकडे पाठवावी व शासन त्यामध्ये निर्णय घेईल, असा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

…अन्यथा कामे रद्द करावी लागतील

n संबंधित ठेकेदाराने रस्त्यांची कामे केली पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. महापालिका अवाजवी रक्कम कोणत्याही परिस्थितीत देऊ शकणार नाही. जे काही नियमाने असेल त्याचा विचार केला जाईल; अन्यथा कामे रद्द केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे आयुक्त पंकज जावळे यांनी सांगितले.

नगरकरांच्या पैशांची लूटमार होऊ देणार नाही

n शहरातील रस्त्यांची दुरुस्ती झालीच पाहिजे. विनाकारण आपल्याला भुर्दंड सोसावा लागत आहे. हा जनतेच्या व शासनाच्या पैशांचा अपव्यय होणार आहे, तो आम्ही होऊ देणार नाही. नगरकरांच्या पैशांची लूटमार आम्ही कदापि सहन करणार नाही, असे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले.

…तर जिल्हाधिकाऱयांना भेटणार

n संबंधित ठेकेदाराने कामे तत्काळ केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. जर त्या संदर्भात निर्णय घेतला नाही, तर आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून देऊ, असे शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले.