नगर पालिकेवर काँग्रेसचा ‘आसूड मोर्चा’, पोलीस कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यांची प्रलंबित कामे आदी मागण्यांसाठी काँगेसने आज नगर महापालिकेवर ‘आसूड मोर्चा’ काढला. यावेळी काँगेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पोलिसांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

नगर शहरात रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यांची प्रलंबित कामे, डीपी रस्त्यांच्या कामांचे रखडलेले प्रकल्प यासाठी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर ‘आसूड मोर्चा’ काढत मनपा प्रशासनाला जाब विचारला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोतराजांसह किरण काळे यांनी मनपावर आसूड उगारत मोर्चाचे नेतृत्व केले. टॉपअप पेट्रोल पंपापासून सुरू झालेला मोर्चा महापालिकेवर धडकला. यावेळी किरण काळे यांनी महापालिकेवर आरोप केले.

काळे म्हणाले, मनपातील सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी दररोज शहरातील रस्त्यांवरून जा-ये करत असतात. त्यांना रस्त्यांवर पडलेले खड्डे दिसत नाहीत का? नागरिकांकडून करसंकलन करण्यासाठी मनपाकडून दारामध्ये वाजंत्री पाठविले जातात. आता खड्डेमुक्त शहरासाठी आम्ही पोतराज आणि वाजंत्री घेऊन महापालिकेला झोपेतून जागे करण्यासाठी आलो आहोत. मनपाने तातडीने रस्त्यांची कामे हाती घेत पावले उचलावीत. अन्यथा नगरकरांच्या संयमाचा उद्रेक होईल, असा इशारा काळे यांनी दिला.

उपायुक्त यशवंत डांगे यांनी केबिन बाहेर येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. मागण्यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.

यावेळी मनोज गुंदेचा, खलील सय्यद यांची भाषणे झाली. शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद यांनी मोर्चाचे सूत्रसंचालन केले. अनंतराव गारदे, प्रवीण गीते, ऍड. अक्षय कुलट, नाथा अल्हाट, अज्जूभाई शेख, हनिफ शेख, वीरेंद्र ठोंबरे, सुजित जगताप, प्रशांत वाघ, सागर काळे, जरीना पठाण, नलिनी गायकवाड, कौसर खान, शारदा वाघमारे, नलिनी गायकवाड, उषाताई भगत, कल्पना खंडागळे, डॉ. मनोज लोंढे, ऋतिक लद्दे, लखन छजलानी, रावसाहेब काळे, दीपक चांदणे, साईनाथ बोराटे, योगेश दिवाने, आसाराम पालवे, सागर ईरमल, ऍड. सुरेश सोरटे, शंकर आव्हाड, सिद्धार्थ झेंडे, अविनाश धनगर, राणी पंडित, शबाना बागवान, रिजवाना शेख, प्रशांत ठोंबरे, शरीफ सय्यद, मोसिम शेख, अक्षय पाचरणे आदी यावेळी उपस्थित होते.

काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा

महापालिकेतील आंदोलनादरम्यान शासन आदेशाचे उल्लंघन करणे, शासकीय सेवकास सार्वजनिक कार्य करण्यास अटकाव करणे, पोलिसांना अरेरावी केल्याप्रकरणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व शहराध्यक्ष मनोज गुंदेचा यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेप्रकरणी काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपावर आसूड मोर्चा काढला होता. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी आयुक्तांच्या दालनात जाण्यापासून अटकाव केल्यानंतर आंदोलक व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. याप्रकरणी समाधान सोळंके यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.