
शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटत असल्याने आता सक्रिय रुग्णांची संख्या 158पर्यंत खाली आली आहे. बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरात बाधितांची संख्या 40च्या आत आढळून येत आहे.
एप्रिल-मे महिन्यांत कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेने जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात कहर केला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील रुग्णसंख्या साडेचार हजारांपर्यंत पोहोचली होती, तर नगर शहरात दररोज सरासरी पाचशे-सातशे रुग्ण आढळून येत होते. कोरोना केंद्र, शासकीय व खासगी रुग्णालये रुग्णांनी ‘फुल्ल’ झाली होती. रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणेदेखील मुश्कील झाले होते. गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाचा कहर कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 7 जूनपासून जिल्हा ‘अनलॉक’ केला आहे. नगर शहर व जिल्ह्यातील कोरोना हटताच नागरिकांची रस्त्यावरील गर्दी प्रचंड वाढली आहे. ‘अनलॉक’ केल्यानंतरही नगर शहरात बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी आहे. आजअखेर नगर शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 158 आहे.
दरम्यान, 13 जूनअखेर शहरातील एकूण बाधितांची संख्या 56 हजार 257 असून, 54 हजार 515 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 868 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मनपा आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार 974 असून, बाधितांची एकूण संख्या दोन लाख 72 हजार 522 इतकी आहे. तर, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख 64 हजार 34 आहे. जिल्ह्यातील मृत्यूंची नोंद चार हजार 514 आहे.
आठ दिवसांतील शहरातीलबाधित संख्या
7 जून 34
8 जून 22
9 जून 10
10 जून 39
11 जून 9
12 जून 18
13 जून 11
14 जून 15
























































