
सामना प्रतिनिधी, नगर
नगर महापालिकेच्या 68 जागांसाठी आज झालेल्या मतदानात 339 उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतपेटीत बंद केले. तब्बल 67 टक्के मतदान झाल्याने मतदारांचा कौल नेमका कुणाला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या टप्प्यातील वाढलेले मतदान निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.
नगरमधील मनपा निवडणुकीसाठी सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. सारडा महाविद्यालयात मतदानाच्या सुरुवातीला मतदान यंत्रामध्ये डाळ टाकण्यात आली होती. यामुळे यंत्रे बंद पडून एक तास उशिराने मतदान सुरू झाले. मतदान केंद्रात याद्यांवरील क्रमांक आणि मतदारांकडील चिठ्ठय़ांवरील क्रमांक यामध्ये तफावत असल्याने अनेक मतदान केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह पदाधिकाऱयांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह पदाधिकाऱयांनी प्रत्येक प्रभागात जाऊन मतदानासंदर्भातल्या अडीअडचणींची माहितीसुद्धा करून घेतली. उद्या सकाळी मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
केंद्रांवर राडा
पत्रकार संदीप रोडे यांना पोलिसांनी मारहाण केल्याची घटनाही घडली असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चौकशीचे आदेश देऊन चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. छिंदम याच्या भावाने मतदान केंद्रात जाऊन मतदान यंत्राची पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महापालिका कर्मचाऱ्याचा मतदान केंद्राच्या आवारात दुर्देवी मृत्यू झाला. मतदार केंद्राबाहेर काही प्रभागांत उमदेवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे प्रकारही घडले होते. वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा प्रसंग टळला गेला. सेंट विवेकानंद स्कूलमधील एका मतदान केंद्राबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा संशय झाला. याप्रकरणी रवींद्र औटी यास 1 लाख 30 हजार रुपये रोकडसह भरारी पथकाने पकडले असून त्याला ताब्यात घेतले आहे.
भाजप कार्यालयाची तोडफोड
प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली असून सदरचा प्रकार हा छिंदम समर्थकांनी केल्याचा दावा उमेदवार परदेशी यांनी केला असून कार्यालयाचे मोठे नुकसान झाले असून पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.
अनिल गोटेंच्या गाडीवर दगडफेक
आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर शनिवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कल्याण भवनजवळ दोन जणांनी दुचाकीवरून येऊन दगडफेक केली. या घटनेत वाहनाची काच फुटली. आमदार अनिल गोटे हे कल्याण भवन येथे उपस्थित असताना हा हल्ला झाल्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सांगितले.
श्रीपाद छिंदमसाठी ‘ईव्हीएम’ची पूजा
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या भावाने चक्क तोफखाना परिसरातील मतदान केंद्रात पुजाऱयासह ईव्हीएम यंत्राची पूजा केली असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.























































