नगरमध्ये चार गाळे जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येथील तपोवन रस्त्यावर एका ओपन प्लॉटमध्ये बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या गाळ्यांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. येथील सहापैकी पाच गाळे जळून खाक झाले आहेत. शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

नगर शहरातील तपोवन रस्त्यावरील एका ओपन प्लॉटमध्ये हे पत्र्याचे गाळे बांधण्यात आले आहेत. त्यातील एका गाळ्याला आज दुपारी आग लागली. सुमारे दोन ते अडीच तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत रामेश्वर ट्रेडर्स, श्रेया लेडीज शॉपी यांसह आणखी दोन ते तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले. माहिती मिळताच, महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी हजर होऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मनपाच्या अग्निशमन बंबासह एमआयडीसीच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. आग मोठी असल्यामुळे सहापैकी सुमारे चार गाळे पूर्णपणे भस्मसात झाले. यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

बघ्यांच्या गर्दीमुळे आग विझवण्यात अडथळा

आग लागल्यामुळे या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तर, काही स्थानिक नागरिक, दुकानदार, नगरसेवक सुनील त्रिम्बके, माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दुकानातून सामान बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले. नागरिकांची गर्दी वाढत असल्यामुळे आग विझविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे तोफखाना पोलिसांनी काही प्रमाणात बळाचा वापर करून नागरिकांना पांगवले. तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक सूरज मेढे आदींसह तोफखाना पोलिसांचे कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत बाजूला करत होते.