नगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या दहा कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणांमध्ये आज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तीन संचालक व एक माजी अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान या फसवणुकीच्या संदर्भामध्ये संबधिताना कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले असून पुढील दोन दिवस चौकशी सुरू राहणार असल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.
नगर मर्चंट बँकेच्या दहा कोटी रुपयांच्या प्रकरणासंदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास 2017 सालापासून झालेला नव्हता. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी या प्रकरणांमध्ये दिरंगाई होत आहे असे म्हणत थेट तक्रार दाखल केलेली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षकांकडे जाधव यांनी आपले म्हणणे सुद्धा मांडले होते. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी या अगोदर तीन जणांची प्राथमिक चौकशी केली होती. गेल्या चार महिन्यापासून कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नसल्याने जाधव यांनी पुन्हा अर्ज देत या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते.
मागील आठवड्यामध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आठरे यांनी बँकेच्या आजी-माजी संचालक तसेच अधिकारी अशा सतरा जणांना नोटिसा बजावित यासंदर्भामध्ये कागदपत्र सहित दिनांक 28/ 29 /30 या तीन दिवशी चौकशीसाठी हजर राहावे अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज चार जणांची चौकशी करण्यात आली. यामध्ये माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कटारियां याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. दहा कोटी रुपयांचे कर्ज दिल्यानंतर कागदपत्राची पूर्तता कशा पद्धतीने करण्यात आली , कर्ज कशा पद्धतीने मंजूर करण्यात आले , कर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित सीडीबी बँकेला ते पैसे कशा पद्धतीने देण्यात आले याची सर्व माहिती तसेच काही कागदपत्रे सुद्धा पोलिसांनी आज तपासली. या चार जणांनी त्यांचे लेखी म्हणणे आज या तपासी अधिकाऱ्यांसमोर दाखल केलेले आहे. उद्या उर्वरित संचालक मंडळाची तसेच अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.
आज झालेल्या चौकशीमध्ये काही कागदपत्र अद्याप पर्यंत मिळालेली नाही ती सुद्धा सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले असल्याचे पोलीस निरीक्षक आठरे यांनी सांगितले. तसेच ज्या बँकेमध्ये हे कर्ज व त्याची रक्कम देण्यात आली त्याचे सर्व डिटेल सुद्धा मागवलेले आहे. अजून दोन दिवस ही चौकशी सुरू राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले


























































