नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारी टोळ्या सक्रिय होत असताना पोलिसांनी अशा टोळ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी विजय पठारे याच्यासह सहाजणांच्या गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
विजय राजू पठारे (वय 40), अजय राजू पठारे (वय 25), बंडू ऊर्फ सूरज साहेबराव साठे (वय 22), अनिकेत विजू कुचेकर (वय 22 ), प्रशांत ऊर्फ मयूर राजू चावरे (वय 24), अक्षय गोविंद शिरसाठ (वय 23, सर्व , रा. सिद्धार्थनगर, ता. जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
नगर जिह्यामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संघटित गुन्हे करणाऱया टोळ्यांचा अहवाल तयार करून संबंधित पोलीस ठाण्याला पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवडय़ात अशाप्रकारे एका टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये नऊ आरोपींचा समावेश होता. या वर्षभरामध्ये पाच टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पदभार घेतल्यानंतर मागील गुन्हेगारांचा छडा लावून व त्यांचे रेकॉर्ड तपासून तोफखाना हद्दीसह जिल्हाभरात विविध ठिकाणी गुन्हा करणाऱया आरोपी विजय पठारे व त्यांच्या टोळीचा अहवाल तयार केला होता. या टोळीने संघटितपणे 4 गुन्हे केलेले असून, इतर 9 गुन्हे त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने केलेले आहेत. या गुन्हेगारी टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी नाशिक परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, वरील सहा आरोपींविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तोफखान्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहायक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके, सहायक पोलीस निरीक्षक सूरज मेढे, जपे, विकास खंडागळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दोन पोलीस ठाण्यांमध्ये 12 गुन्हे दाखल
पठारे टोळीने अनेक गुन्हे संघटितपणे केलेले आहेत. तोफखाना व कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्र्ाांसह जबरी चोरी करणे, घातक शस्त्रांचा वापर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, अनाधिकाराने घरात प्रवेश करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, विनयभंग करणे, दुखापत करणे, हद्दपार आदेशाचा भंग करणे, गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे इत्यादी प्रकारचे दखलपात्र स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 12 गुन्हे दाखल आहेत.
वरीलप्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱया टोळ्यांविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. नगर जिह्यात गंभीर गुन्हे करणाऱया टोळ्यांविरुद्ध आगामी काळात ‘मोक्का’न्वये कारवाई करण्यात येणार आहे.
– मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, नगर.




























































