पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर पोलीस अधीक्षक कार्यालतील एका कर्मचाऱयाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पुणे येथे उपचारादरम्यान आज त्याचे निधन झाले. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सोमनाथ कांबळे (वय 45) असे मृत पोलीस कर्मचाऱयाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेल्या सोमनाथ कांबळे या पोलीस कर्मचाऱयाने 12 मार्च रोजी एमआयडीसी परिसरामध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना तत्काळ नगरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. मात्र, प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गृह शाखेचे पोलीस उपअधीक्षक मेघश्याम डांगे यांनी सदरची घटना घडली असून, तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.