उपोषणाला बसलेल्या ठेवीदारांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रवरा संस्थेच्या प्रशासकावर गुन्हा दाखल करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थावर मिळकतीच्या लिलावाचा कट करणाऱया जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) आणि संस्थेच्या प्रशासकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वयोवृद्ध ठेवीदारांनी मंगळवारी (दि. 15) स्वातंत्र्य दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱया दिवशी बुधवारी (दि. 16) एकाही अधिकाऱयाने या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केलेली नाही. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱयांसह सर्वच अधिकारी ‘शासन आपल्या दारी’ म्हणत मंत्र्यांच्या ‘दरबारी’ असून, वयोवृद्ध ठेवीदार जिल्हाधिकारी यांच्या ‘दारी’ न्यायाच्या अपेक्षेने बसले असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

ठेवीची रक्कम परत मिळावी, यासाठी सुमारे 250 ठेवीदार मागील काही वर्षांपासून शासकीय, न्यायालयीन पातळीवर लढा देत आहेत. ठेवीची रक्कम परत मिळेल, या आशेवर प्रत्येक दिवस जगत आहेत. यापैकी काही ठेवीदार आतापर्यंत मयतही झाले आहेत. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना अद्यापि न्याय मिळालेला नाही. न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर हा न्यायाचा लढा सुरू असतानाच, सहकार खात्यातील सर्वोच्च अधिकारी असणारे जिल्हा उपनिबंधक आणि प्रशासकाने स्थावर मिळकतीचा लिलाव करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवीदार आणि त्यांचे वकील ऍड. महेश आनंदास यांनी केला आहे.

आता ठेवी मिळविण्याबरोबरच संबंधित अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी ठेवीदारांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण केले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. ठेवीदार किसन शिंदे हे वयोवृद्ध असून, ते आमरण उपोषणास बसले आहेत़ तर इतर ज्येष्ठ ठेवीदार साखळी उपोषण करून आंदोलनात सहभागी झाले आहेत. उपोषणाच्या दुसऱया दिवसापर्यंत एकाही प्रशासकीय अधिकाऱयाने उपोषणकर्त्यांची विचारपूस केलेली नाही. विशेष म्हणजे सर्व अधिकारी हे मुख्यमंत्र्यांच्या शिर्डी दौऱयात व्यस्त आहेत.

पालकमंत्र्यांनी सगळे अधिकारी लावले कामाला

– गेल्या एका महिन्यापासून शिर्डी येथील रखडलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम गुरुवारी (दि. 17) होणार असल्याने नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पूर्ण प्रशासकीय ताकद या कार्यक्रमासाठी लावली आहे. त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. वृद्ध ठेवीदार पालकमंत्र्यांच्या प्रवरा संस्थेविरोधात उपोषणाला बसले आहेत.