
नगर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक अमोल येवले यांना तिघांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. आरोपींनी हॉटेलवर दगडफेक करत दोन वाहनांचे नुकसान केले आहे. येवले यांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित अर्जुन कोतकर (वय 32, रा. कोतकर मळा, केडगाव, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. 9) एप्रिल रोजी रात्री एकच्या दरम्यान दुचाकीवरून तिघे कोतकर यांच्या हॉटेल सागर येथे आले. आरोपींनी चेहरे पूर्णपणे झाकलेले होते. त्यातील एका आरोपीने हॉटेलवरील कामगाराला ‘कुठे आहे तो अमोल येवले’ असे विचारले.
त्यानंतर ‘तुम्ही इथून निघून जा, येथे अमोल येवलेचा मर्डर होणार आहे’ असे आरोपी म्हणाले. काही काळ आरोपींनी तेथे धिंगाणा घातला, यानंतर हॉटेलसमोरील वाहनांवर दगडफेक सुरू केली. यामध्ये दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.



























































