नगर-सोलापूर महामार्ग, बाह्यवळण रस्ता होणार सुस्साट, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दळणवळण सोयीस्कर व्हावे, या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून रस्ते चारपदरी, करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर शहरालगत असलेला बाह्यवळण रस्ता चारपदरी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी जमिनी अधिग्रहणची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासाठी आलेल्या निधीतून 146 कोटी रुपये संबंधितांना देण्यात आले आहेत. तर, नगर-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचेही काम हाती घेण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग यांची कामे सध्या सर्वत्र प्रगतिपथावर सुरू झालेली आहेत. नगर शहराबाहेरून जाणाऱया बाह्यवळण रस्त्याचे चौपदरीकरणही सुरू करण्यात आलेले आहे. पुण्यावरून संभाजीनगरकडे जाणाऱया, तसेच सोलापूरहून गुजरातकडे जाणाऱया अवजड वाहनांसाठी या बाह्यवळण रस्त्याची मोठी मदत होणार आहे. या बाह्यवळण रस्त्यासाठी लागणाऱया अतिरिक्त जमिनी अधिग्रहित करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

नगर बाह्यवळण रस्त्यासाठी अधिग्रहित केल्या जाणाऱया जमिनींची मोजणी करून संबंधितांना त्याची रक्कम दिली जाणार आहे. आतापर्यंत स्थानिक प्रशासनाला 165 कोटी प्राप्त झाले आहेत. त्यांपैकी 146 कोटी रुपये संबंधितांना देण्यात आले असून, त्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या आहेत. उर्वरित जमिनींचे अधिग्रहण दुसऱया टप्प्यात होणार आहे. अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग करून या बाह्यवळण रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

नगर-सोलापूर महामार्गाचेही चौपदरीकरण केले जाणार आहे. नगर-सोलापूर महामार्गावर येणाऱया 10 गावांमधील जमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यासाठीही पहिल्या टप्प्यातील 50 कोटी रुपयांचा निधी येथील प्रशासनाला प्राप्त झाला आहे. नगर-सोलापूर महामार्गावर नगर तालुक्यासह श्रीगोंदा, जामखेड व कर्जत तालुक्यांमधील काही गावांचाही समावेश आहे. त्यामुळे तीन तालुक्यांमधील जमिनी अधिग्रहित केल्या जाणार आहेत. नगर तालुक्यातील गावांमधील जमिनी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

‘बाह्यवळण रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून, त्यासाठी जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जमीन अधिग्रहणासाठी पहिल्या टप्प्यातील निधीसुद्धा प्राप्त झाला आहे. प्रशासकीय पातळीवरील काम सध्या सुरू आहे.’

– श्रीनिवास अर्जुन, प्रांताधिकारी.

डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरण करण्याची मागणी

z बाह्यवळण रस्त्याचे चौपदरीकरण करताना त्याचे डांबरीकरण करणार की सिमेंट काँक्रिटीकरण करणार? याबाबतचा निर्णय अद्यापि झालेला नाही. भविष्याचा व अवजड वाहतुकीचा विचार करून हे महामार्ग सिमेंट काँक्रीटचे करावेत, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.