
नगर शहरासह जिह्यात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे मास्क न घालणाऱयांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीच थेट रस्त्यावर उतरत शहरातील कापड बाजार, बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नियमांचे पालन न करणारी दुकाने महिनाभर बंद ठेवण्याचा इशारा जिल्हाधिकाऱयांनी यावेळी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न घालणाऱयांना 500 रुपये दंडाचा आदेश दिलेला आहे, तरीही नागरिक मास्क घालत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले व पोलीस अधीक्षक पाटील यांनी आज अचानक कापड बाजार येथे येऊन मास्क नसणाऱयांवर कारवाई सुरू केली. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे, मनपाचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील उपस्थित होते.
नगर शहर व जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालेले आहे. गेल्या काही दिवसांपासून नगरमध्ये पोलिसांनी मास्क नसणाऱयांविरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले व पोलीस अधीक्षक पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नगर-संभाजीनगर रस्त्यावरील तीन मंगल कार्यालयांवर कारवाई केली होती.
डॉ. भोसले व पाटील यांनी कापड बाजारातील काही दुकानांमध्ये बाहेरगावाहून खरेदीसाठी आलेल्या, मास्क न घातलेल्या नागरिकांवर कारवाईचे निर्देश यावेळी दिले. तसेच दुकानदारांनासुद्धा तंबी देत विनामास्क ग्राहक दुकानात दिसल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिला. त्यानंतर पुणे बस स्थानकामध्ये जाऊनही त्यांनी दंडात्मक कारवाई केली.
‘आम्ही प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने पाहणी करणार आहोत. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले तर आम्हाला लॉकडाऊनशिवाय पर्याय उरणार नाही. शाळांबाबत आठ दिवस वाट पाहून निर्णय घेण्यात येईल. संस्थाचालकांशी बोलणी सुरू आहेत. वेळप्रसंगी शाळा बंद करण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. दंडात्मक कारवाई हा आमचा उद्देश नाही. मात्र, सर्वांनी नियम पाळले पाहिजेत, हा त्यामागचा उद्देश आहे.’
– डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी.
…तर वधू-वरांवरही कारवाई करणार!
– 16 हजार लोकांकडून 28 लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याचे सांगितले. मंगल कार्यालयांसंदर्भात आम्ही मागील आठवडय़ापासून मोहीम सुरू केली आहे. आत्ता 44 लग्न समारंभ नगर शहरामध्ये आहेत. आम्ही पोलिसांकडून या लग्नांचे व्हिडीओ शूटिंग घेणार आहोत. नियमांचे उल्लंघन झालेले आढळून आल्यास संबंधितांसह वधू-वरांवरसुद्धा कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

































































