
एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मीरा-भाईंदर पोलिसांचे टेन्शन कमी झाले आहे. विनाहेल्मेट, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे अशा प्रकारे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांची दमछाक होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाहतूक विभागाने एआय तंत्रज्ञानाची मदत घेण्यास सुरुवात केल्याने ही कामे जलद गतीने आणि सोपी होऊ लागली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत नियमांना ब्रेक लावणाऱ्यांवर 194 केसेस दाखल केल्या आहेत.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर ड्युटीवरील पोलीस सतत वॉच ठेवून असतात. मात्र आता त्यांच्या मदतीला ‘एआय’ आले असून पोलिसांची काम काहीशी हसून होऊ लागली आहेत. मार्च महिन्यापासून पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. त्यानुसार 7 एप्रिल रोजी एआयच्या मदतीने पहिले चलन काढण्यात आले. या ई चलनामुळे पोलिसांना थेट फोटोचे पुरावे मिळू लागले. सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था, पादर्शक आणि अचूक दंड प्रणाली सोपी झाल्याने बेफिकीर वाहनचालकांनादेखील चाप बसणार आहे.
एआय तंत्रज्ञानावर आधारित वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी विसोप प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून त्याद्वारे आता वाहतूक विभाग अपडेट झाला आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांना लगेच शिक्षा करणे सोपे झाले आहे.
शिस्त, सुरक्षा आणि तंत्रज्ञान या त्रिसुत्रीच्या आधारामुळे मीरा-भाईंदरचा वाहतूक विभाग डिजिटली स्मार्ट झाला असून यापुढेही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या पंधरा दिवसांत विना सीट बेल्टच्या 163 केसेस दाखल झाल्या. विनाहेल्मेटच्या 30 व अन्य एक अशा 194 केसेस करण्यात वाहतूक विभागाला यश आले आहे.