इंजिनीयरिंगची वार्षिक फी 79 हजार रुपये निश्चित होणार, ‘एआयसीटीई’चा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैद्यकीय महाविद्यालयांप्रमाणे आता अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) महाविद्यालयातही किती फी ठेवायची हे निश्चित होणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशातील इंजिनीयरिंग आणि तंत्रशिक्षण महाविद्यालयांची कमाल आणि किमान फी निश्चित करावी अशी शिफारस केली आहे.

एआयसीटीईने फी किती असावी त्याचा आराखडा महाविद्यालयांना पाठवला आहे. त्यानुसार वार्षिक फी 79 हजार रुपयांपेक्षा कमी नसावी आणि 1 लाख 89 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी असे म्हटले आहे. 2015 मध्ये याचसंदर्भात नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीने इंजिनीयरिंगच्या चार वर्षीय पदवीपूर्व अभ्यासक्रमाची फी 1 लाख 44 हजार रुपये आणि 1 लाख 58 हजार रुपयांच्या दरम्यान असावी अशी शिफारस केली होती.

नॅशनल मेडिकल कमिशनने खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्षापासून फी मर्यादित ठेवण्यास सांगितले आहे. त्याच धर्तीवर एआयसीटीईने इंजिनीयरिंग महाविद्यालयांच्या फीलाही मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला. निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शुल्क समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये करण्यास एआयसीटीईच्या कार्यकारी समितीने गेल्या 10 मार्च रोजीच मंजुरी दिली होती.

राज्य सरकारांची सातत्याने बंधने येऊ लागल्याचा आरोप करत खासगी इंजिनीयरिंग महाविद्यालयांनीच किमान फी निश्चित करण्याची मागणी केली होती. श्रीकृष्ण समितीने इंजिनीयरिंगच्या डिप्लोमाची फी कमाल 1 लाख 4 हजार आणि किमान 67 हजार रुपये निश्चित केली होती तर पदव्युत्तर इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांची फी किमान 1 लाख 41 हजार आणि कमाल 3 लाख 3 हजार रुपये असावी अशी शिफारस केली होती. तंत्रशिक्षणाचे बाजारीकरण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही समिती नेमण्यात आली होती.