146 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनाला आग

चीनमध्ये एक विमान हवेत असताना अचानक गोंधळ उडाला. 146 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर चायना विमानाच्या इंजिनाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. त्यानंतर केबिनमध्ये धूर पसरुन नऊ प्रवाशांची तब्येत बिघडली. मात्र हवेतील विमानाच्या इंजिनाला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचं आणि भीतीचं वातवरण पसरलं होतं. वैमानिकाने तातडीने विमान सिंगापुरच्या विमानतळावर खाली केले.

चांगी विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, एअर चायना एअरबस ए320 विमानात एकूण 146 प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स होते. हे विमान चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगडू शहरातून येत होते आणि रविवारी दुपारी 4.15 वाजता चांगी विमानतळावर त्याचे तातडीने लँडिंग करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमानातील नऊ प्रवाशांना केबिनमध्ये पसरलेल्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि बाहेर काढताना किरकोळ ओरखडे आल्याचे सांगण्यात आले.

पुढे त्यांनी सांगितले की, विमानाचा कार्गो होल्ड (सामान ठेवलेला भाग) आणि विमानाच्या टॉयलेटमध्ये धूर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वैमानिकाने तातडीने लँण्डिंगची परवानगी मागितली. तर एका प्रवाशाने चिनच्या माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, धुरामुळे केबिनचे दिवे चालू-बंद व्हायला लागले आणि काही प्रवासी त्यांच्या सीटवर उभे राहिले, त्यानंतर क्रू मेंबर्सने त्यांना धीर धरण्याचे आणि त्यांच्या जागेवर बसण्याचे आवाहन केले. चीनच्या माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सिंगापुरमध्ये विमानाला तातडीने लँडिंग केल्यानंतर इंजिनला लागलेली आग विझवण्यात आली. एअर चायनाने सोमवारी एक निवेदन जारी करून प्राथमिक तपासात  तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या इंजिनला आग लागल्याचे स्पष्ट केले.