एसी लोकलमध्ये पाण्याची गळती!

चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने लोकल प्रवाशांना हायसे वाटत असले तरी आज पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची पाऊस नसतानाही अंघोळ झाली. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमधील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यामुळे डब्यातील एसी डक्टमधून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. परिणामी गाडीत चढणाऱया प्रवाशांच्या अंगावर पाणी पडत असल्याने ते चांगलाच संताप व्यक्त करत होते. पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलमध्ये वारंवार बिघाड होत आहेत. कधी गाडीचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांची गैरसोय होते, तर कधी एसी बंद असल्याने दरवाजे उघडे ठेवून गाडी चालवण्याची नामुष्की ओढवते. त्यातच आज सकाळीच एसी लोकलच्या वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने ठिकठिकाणी डब्यात पाण्याच्या धारा लागल्या होत्या. विरारपासून अंधेरीपर्यंत हा प्रकार सुरू होता.