
हिंदुस्थान-चीन सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी 16 वी सैन्य स्तरावरील चर्चा सुरू आहे. मात्र, दगाबाज चीनचा मुकाबला करण्यासाठी आपले लष्कर सज्ज आहे. त्यासाठी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर मिसाइल डिफेन्स सिस्टीम असलेले एस 400 तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती हवाई दल प्रमुख एयर मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी दिली.
आजादी के अमृत महोत्सवनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी चीनकडून होणाऱ्या घुसखोरीबाबतही वक्तव्य केले. पूर्व लडाखच्या सीमेवर रडार तैनात करण्यात येत आहे. हे रडार आपल्या आयएसीसीएस प्रणालीशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे एलएसीजवळील प्रत्येक ठिकाणची देखरेख ठेवणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सीमारेषेवर योग्य ती काळजी घेण्यासोबतच जमीनीवर हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि शस्त्रसामग्री ठेवण्याच्या क्षमतेतही वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सीमेवर देखरेख ठेवण्यासाठी मोबाईल चौक्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. चीनकडून होणाऱ्या हवाई हालचालींवर नजर ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
एस 400 ही क्षेपणास्त्र प्रणाली पाकिस्तान आणि चीनच्या सीमारेषेवर तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यात आपण सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


























































