
एअर इंडियाच्या प्रवाशाने तब्बल पावणेतीन लाखांचे तिकीट काढले, पण चांगल्या व आरामदायी प्रवासाऐवजी त्याला तुटलेली सीट आणि टॉयलेटची दुर्गंधी मिळाली. याविरोधात प्रवाशाने दिल्ली ग्राहक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्याला दीड लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिली.
दिल्लीतील प्रवाशाने न्यूयॉर्कच्या दोन रिटर्न तिकीट काढल्या होत्या. त्यातील एक तिकीट त्यांच्या मुलीचे होते. त्यासाठी त्यांनी 2 लाख 73 हजार 108 रुपये मोजले. दोघे 6 सप्टेंबर 2023 रोजी न्यूयॉर्कला गेले आणि 13 सप्टेंबर 2023 रोजी परत आले. हा 15 तासांचा प्रवास त्यांच्यासाठी खूपच वाईट होता. याविरोधात त्यांनी एअर इंडियाकडे तक्रार केली. मात्र कंपनीकडून योग्य दखल न घेतल्याने त्यांनी दिल्ली ग्राहक न्यायालयात धाव घेतली. प्रवाशात विमानात तुटलेल्या सीट्स मिळाल्या होत्या. फ्लाईट अटेंडंटला बोलावणारे बटणही तुटले होते. विमानात टॉयलेटची दुर्गंधी येत होती. स्टाफकडून एअर फ्रेशनर मारले जात नव्हते. प्रवाशाने विमानातील दुरवस्थेचे फोटो कोर्टात सादर केले. प्रवाशाच्या खाण्यापिण्याचीही गैरसोय झाली होती. प्रवासात त्यांना थंड चहा देण्यात आला होता.
प्रवाशाने 3 आणि 9 नोव्हेंबर 2023 रोजी एअर इंडियाला कायदेशीर नोटीस पाठवली. मात्र त्याचे उत्तर आले नाही. त्यानंतर त्यांनी नवी दिल्ली जिल्हा ग्राहक मंचात तक्रार केली. त्यावर 14 जानेवारी 2026 रोजी सुनावणी झाली.
n नवी दिल्ली ग्राहक न्यायालयाने याप्रकरणी एअर इंडियाला दोषी ठरवले. प्रवाशाला आणि त्यांच्या मुलीला मानसिक त्रासासाठी प्रत्येकी 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच खटल्याच्या खर्चासाठी कंपनीकडून 50 हजार रुपये दिले.




























































