
दिल्लीहून लंडनच्या हिथ्रोला जाणाऱया एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे सात तासांचा प्रवास केल्यानंतर हे विमान पुन्हा एकदा दिल्ली विमानतळावर उतरले. या घटनेमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तसेच एअर इंडियाच्या सेवेवरही पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी सकाळी सहा वाजता एअर इंडियाची फ्लाईट एआय111 ने दिल्ली एअरपोर्टहून लंडनसाठी उड्डाण केले. हे विमान सौदी अरबच्या हवाई क्षेत्रात होते. त्या वेळी पुन्हा एकदा दिल्लीकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाआधी जवळपास चार तास हवेत राहावे लागले. यामुळे या विमानाला एकूण सात तासांनंतर जवळपास दुपारी साडेबारा वाजता दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.
उड्डाणवेळी विमानाच्या आतमध्ये आवाज ऐकल्याचेही काही प्रवाशांनी सांगितले. तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाला माघारी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. प्रवाशांना झालेल्या विलंबाबद्दल एअर इंडियाने खेद व्यक्त केला आहे.
15 मार्चलाही याच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी हे विमान न्यूयॉर्कहून दिल्लीला जात होते. तांत्रिक बिघाडामुळे या विमानाला आयर्लंडच्या शैनन शहराकडे वळवण्यात आले होते. एअर इंडियाच्या नव्या ए350-900 विमानात तांत्रिक बिघाड होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.



























































