एअर इंडिया विमानाच्या इंजिनाला आग

 

बंगळुरूहून कोचीला जाणाऱया एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनला शनिवारी रात्री आग लागली. यानंतर विमानाचे बंगळुरू एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानातील सर्व 179 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले.  विमानाने टेक ऑफ केल्यानंतर लगेचच आग लागली. रात्री 11.12 वाजता विमान उतरल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढणे आणि दुसऱया बाजूने आग विझवण्याचे काम एकाच वेळी करण्यात आले. घटनेनंतर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले, आतापर्यंतच्या तपासानुसार फ्लाईटच्या उजव्या इंजिनमध्ये आग लागली. त्यानंतर विमानाचे लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.   लँडिंगच्या वेळी ग्राऊंड सर्व्हिसलाही ज्वाळा दिसल्या. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.