वायू प्रदूषणामुळे लोकांचे वय कमी होत आहे! तज्ज्ञांकडून जाणून घ्या संरक्षणात्मक उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढते औद्योगिकीकरण, तंत्रज्ञान, वाहने यांच्या अतिवापरामुळे सध्या जगभरात वायू प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. वायू प्रदूषणाचा परिणाम लोकांच्या वयावर होत असल्याचे एका अभ्यासातून उघडकीस आले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या हवेच्या प्रदूषणामुळे लोकांचे आयुष्य दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. अमेरिकन रिसर्च गुपच्या अहवालातून प्रदूषणाबाबत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासाद्वारे, वायू प्रदूषणाचा परिणाम वयावर होत असून यामुळे लोकांचे आयुर्मान कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

शिकागो येथील युनिव्हर्सिटी ऑफ एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या अहवालानुसार, वायूप्रदूषणामुळे लोकांचे आयुर्मान 2 वर्षांपेक्षाही जास्त वर्षांनी कमी झाले आहे. हिंदुस्थानात 2013 सालानंतर प्रदुषणात झपाट्याने वाढ झाली असून यामुळे लोकांचे वय 5 वय वर्षांनी घटले आहे तसेच एपिकच्या अहवालात म्हटले आहे की, भौगोलिकदृष्ट्या वायू प्रदूषणाची पातळी वाढतच चालली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये हवेची गुणवत्ता वेगाने खालावत आहे. अलीकडच्या काळात प्रदूषणाचे सर्वाधिक घातक परिणाम दक्षिण आशियात दिसून आले आहेत. याशिवाय दक्षिण पूर्व आशिया, मध्य आणि पश्चिम आफ्रिका, अमेरिका आणि युरोपमधील प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.

दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस विभागाच्या संचालक डॉ. सोनिया रावत यांच्या मते, हवेच्या प्रदूषणामुळे आपल्या फुफ्फुसांवर सर्वाधिक परिणाम होतो. धूळ, माती आणि धूर यांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने फुफ्फुसे कमकुवत होतात. कधी कधी त्यांचे आरोग्य बिघडून त्यांना सूज येते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे संसर्गदेखील होऊ शकतो. हवेचे प्रदूषण जास्त आहे, अशा ठिकाणी राहिल्यास अस्थमा आणि अॅलर्जीच्या समस्या उद्भवू शकतात याशिवाय प्रदूषणामुळे छातीत दुखणे, जठराची समस्या डोळे लाल होणे, तोंड कोरडे होणे अशी लक्षणे दिसून येतात.

वायू प्रदूषण टाळण्यासाठी संरक्षणात्मक उपाय
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वायू प्रदूषण टाळण्यासाठी बाहेर जाताना मास्क लावा. धूळ, माती किंवा धूर जास्त असेल अशा ठिकाणी जाणे टाळा. घरात प्रदूषित हवा शोषून घेणारी रोपटी लावूनही यापासून आराम मिळवू शकता. प्रदूषणादरम्यान घराच्या खिडक्या बंद ठेवाव्यात आणि एअर प्युरिफायरही लावू शकता. जे लोक धूम्रपान करतात, त्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर हवेच्या प्रदूषणामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल तर ताबडतोब तज्ञाशी संपर्क साधावा.