प्रदूषित हवेमुळे वाढते वजन, दीर्घकाळ दूषित हवेत श्वास घेतल्याचे दुष्परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदूषित हवा शरीराला हानीकारक आहे, हे आपण जाणतोच. प्रदूषित हवा केवळ फुफ्फुसांनाच नव्हे तर हृदयाला घातक असते. हवेतील लहान धुळीच्या कणांशी दीर्घकाळ संपर्क आल्यास श्वसनाशी संबंधित आजार, अस्थमा, श्वसननलिकेचा त्रास अशा अनेक समस्या उद्भवतात. दूषित हवा कर्परोगाचेही कारण बनू शकते. अशातच आता प्रदूषित हवेत दीर्घकाळ श्वास घेतल्यास वजन वाढू शकते, असे नव्या संशोधनातून दिसून आलंय.

वायूप्रदूषणामुळे आपल्या वजनावर किती परिणाम होतो, यावर संशोधन करण्यात आले आहे. त्यासाठी संशोधकांनी उंदरांवर प्रयोग केले. गर्भधारणा केलेल्या उंदरींना प्रदूषित हवेत ठेवण्यात आले तर दुसऱया उंदरांना प्रदूषणविरहित हवेच्या संपर्कात ठेवण्यात आले. 19 दिवसांनंतर दोन्ही गटांतील उंदरांना श्वास घेण्यास किती त्रास होतोय, हे अभ्यासण्यात आले. याशिवाय जे उंदीर अत्यंत प्रदूषित हवेत राहिले, त्यांचे वजन आठ आठवडय़ांनंतर वाढलेले दिसून आले.

  • प्रदूषण आणि वजन यांचा संबंध स्पष्ट करणारा अभ्यास फेडरेशन ऑफ अमेरिकन सोसायटीजच्या जर्नलमध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे.
  • प्रदूषित हवेत दीर्घकाळ राहिल्यास वजन वाढते. सध्या तरी उंदरांवर संशोधन करून हा निष्कर्ष काढण्यात आला असला तरी माणसांवरही प्रदूषणाचा हाच परिणाम होऊ शकतो.
  • प्रदूषणापासून स्वत:ला वाचवायला हवे. घराबाहेर पडताना फेस मास्क अवश्य वापरावा. शुद्ध हवा देणारी झाडे घराभोवती लावा किंवा घरात एयर प्युरीफायर बसवा.