‘तू दूधवाला आहेस का?’ अजय देवगणच्या अक्षय कुमारला कोपरखळ्या

8246

रोहित शेट्टीच्या आगामी सूर्यवंशी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेलर लाँचच्या सोहळ्यातही सूर्यवंशीच्या संपूर्ण टीमने धम्माल केली आहे. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यात अजय देवगणने सर्वांसमक्ष अक्षयला तू दूधवाला आहेस का, असा प्रश्न विचारल्याने एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

त्याचं झालं असं की, ट्रेलर लाँच सोहळ्याच्या ठिकाणी अक्षय, अजय, कतरिना, रोहित आणि इतर सर्वजण वेळेत पोहोचले होते. सोहळा सुरूही झाला. पण, रणवीर सिंग मात्र तब्बल 40 मिनिटे उशिराने पोहोचला. त्यावर अक्षयने रणवीरची चांगलीच शाळा घेतली. त्यावेळी रोहितने रणवीरच्या उशिरा येण्याच्या सवयीची त्याला सिम्बाच्या चित्रीकरणापासूनची सवय असल्याचं म्हटलं. तेव्हा अक्षयनेही सूर्यवंशीच्या चित्रीकरणावेळीही रणवीर त्याला सकाळी सात वाजता उठवायला येत असल्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला की, रणवीर मला माझ्या रूमवर सकाळी सात वाजता उठवायला यायचा. पण, मी त्याला सांगायचो की मी पहाटे चार वाजताच उठलो आहे. व्यायाम करून मी शरीराला थोडा आराम देत आहे, असं अक्षय यावेळी म्हणाला.

अक्षयचं हे बोलणं ऐकून इतका वेळ शांत बसलेल्या अजयनेही या संभाषणात उडी घेतली. त्याने अक्षयच्या लवकर उठण्यावरून त्याला कोपरखळ्या मारल्या. आम्ही सगळे जेव्हा झोपून उठतो, तेव्हा अक्षयने त्याचा एक चित्रपट पूर्ण केलेला असतो, असं म्हणत अजयने त्याला इतक्या सकाळी उठायला तू दूधवाला आहेस का? असं म्हटलं. त्याबरोबर सभागृहात एकच हशा पिकला.

सोमवारी सूर्यवंशी या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरही प्रसिद्ध झाला. मुंबईवर होऊ घातलेल्या दहशतवादी हल्ल्याची कथा या चित्रपटात आहे. अक्षय कुमार यात सूर्यवंशी या पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात झळकणार आहे. त्याला सोबत देण्यासाठी सिम्बा आणि सिंघमही चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाची कथा आणि तिचं सादरीकरण पाहता रोहित शेट्टी पुन्हा एकदा तिकीटबारीवर धमाका करणार असं दिसत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, कतरिना कैफ, जावेद जाफरी, कुमुद मिश्रा अशी कलाकारांची मांदियाळी आहे. विशेष म्हणजे यात जॅकी श्रॉफही एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

पोलिसांच्या आयुष्यावरचे सिंघम, सिम्बा असे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टीने यंदा त्याच्या सूर्यवंशी या चित्रपटासाठी मात्र गुढी पाडव्याचा मुहूर्त निवडला आहे. सूर्यवंशी हा चित्रपट 2020 मध्ये ईदला प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सलमान खानचे हल्लीचे सगळे चित्रपट ईदला प्रदर्शित होतात. त्यामुळे सलमान खानचे चाहते रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारवर संतापले होते. कारण बॉक्स ऑफीसवर सूर्यवंशी आणि सलमानच्या चित्रपटात संघर्ष झाला असता. पण, रोहितने हा चित्रपट गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित करण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या दिवशी सायंकाळी सहापासून ते पुढे 24 तास या चित्रपटाचे शो ठेवण्यात आले आहेत. हा चित्रपट येत्या 24 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा ट्रेलर-

आपली प्रतिक्रिया द्या