मेनका गांधी घटीया महिला आहे! भाजप आमदाराच्या ट्विटने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी मंत्री आणि भाजप खासदार मेनका गांधी या ‘घटीया महिला’ आहेत अशा शब्दात आमदार अजय बिष्णोई यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मेनका गांधी या भाजपच्या खासदार असून बिष्णोई हे देखील भाजपचे आमदार आहेत. आमदाराने स्वपक्षीय खासदारावर अशा शब्दात टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मेनका गांधी यांनी जबरलपूरमधल्या एका पशूंच्या डॉक्टरशी बोलताना काही विधाने केली होती जी बिष्णोई यांना आवडलेली नाहीयेत. यामुळेच त्यांनी ही टीका केली आहे.

बिष्णोई यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की ‘खासदार मेनका गांधी यांनी पशुचिकीत्सक विकास शर्मा यांच्याशी बोलताना जे शब्द वापरलेत त्यामुळे जबलपूर घटीया होत नाही. मात्र एक गोष्ट नक्की सिद्ध होते की मेनका गांधी अतिशय घटीया महिला आहे. मला लाज वाटते की त्या माझ्या पक्षाच्या खासदार आहेत.’

वाद नेमका काय आहे ?

डॉक्टर विकास शर्मा हे पशूंचे डॉक्टर असून ते नानाजी देशमुख पशु चिकीत्सा विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांना फोन करून मनेका गांधी यांनी नानाजी देशमुख पशुचिकीत्सा विद्यालय हे घटीया असल्याचं म्हटलं होतं असा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या या विधानामुळे जबलपूरवासी नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. बिष्णोई यांच्या ट्विटमुळे या सगळ्या वादाला नवं वळण मिळताना पाहायला मिळतंय.