‘अयोध्या’ निकालानंतरच्या यूपीतल्या सलोख्याचे कौतुक, डोवाल यांनी थोपटली योगी सरकारची पाठ

316
ajit-doval

अयोध्येतील रामजन्मभूमीचा बहुप्रतीक्षित निकाल आल्यावर उत्तर प्रदेशात शांतता, सलोखा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेले कार्य खरेच स्तुत्य असेच आहे. सरकारी प्रशासन आणि उत्तर प्रदेश पोलीस त्यासाठी निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत, अशा शब्दांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी उत्तर प्रदेश सरकारची पाठ थोपटली आहे.

एक शतकाहून अधिक काळ चाललेल्या ‘अयोध्या’ वादावर यंदा 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त भूमी रामलल्लाचीच असल्याचे मान्य करीत 5 सदस्यीय घटनापीठाने भव्य राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा केला होता. शिवाय मुस्लिमांनाही मशिदीसाठी योग्य स्थळी 5 एकर जमीन द्यावी असे आदेशही न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. या निकालानंतर उत्तर प्रदेशसह देशभरात तणाव पसरेल आणि जातीय सलोखा बाधित होईल ही भीती उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने खोटी ठरवली. सरकार आणि पोलीस यंत्रणांनी जातीय आणि धार्मिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रभावी उपाय राबवले अशी कौतुकाची थाप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांनी यूपीचे मुख्य सचिव राजेंद्रकुमार तिवारी आणि पोलीस महासंचालक ओ. पी. सिंग यांना पत्र पाठवून दिली आहे.

‘अयोध्या’ निकालानंतर राज्यातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांत सलोखा आणि शांतता राखण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन आणि पोलिसांनी केलेले कार्य स्तुत्यच आहे. विशेषतः त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जो समन्वय होता तो अभिनंदनीयच होता. भविष्यातही राज्यात असेच सलोखा आणि सौहार्दाचे वातावरण कायम राहील असा मला विश्वास आहे. – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

आपली प्रतिक्रिया द्या