आधी दादागिरी, नंतर दिलगिरी… भिकारxx शब्दावरून अजित पवार यांनी मागितली माफी

मी पालकमंत्री आहे, माझं लक्ष असतं. मी कामाचा माणूस आहे, आधी करतो मग बोलतो. इतर नेते आणि त्यांची शहरं भिकारxx आहेत, या वक्तव्यावरून टीका होऊ लागताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माफी मागत दिलगिरी व्यक्त केली.

अंबाजोगाई येथील सभेत जीभ घसरल्याने झालेल्या वादावर अखेर अजित पवार यांनी अकोला जिह्यातील अकोट येथील जाहीर सभेत माफी मागितली. सभेत बोलताना एखादा शब्द चुकीचा निघू शकतो, पण त्या शब्दाने लोकांची भावना दुखावली असेल तर त्याबद्दल क्षमा मागणे माझे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करत अजितदादांनी भिकारxx या शब्दावरून निर्माण झालेला वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

अंबाजोगाई येथे मी जे बोललो ते शहरातील अस्वच्छतेविरोधात होते. मात्र, वापरलेला शब्द योग्य नव्हता, हे मला जाणवले. मी चुकीचा शब्द वापरला, भिकारxx तो शब्द माझ्याकडून निघायला नको होता. त्याबद्दल मी जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त करतो, असे अजित पवार म्हणाले.