राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने सिडको येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अल्पसंख्याक संमेलनाचा पुरता फज्जा उडाला. या संमेलनासाठी दहा हजार कार्यकर्ते येणार असल्याचे अपेक्षित धरण्यात आले होते. तशी आसन व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात फक्त 900 च्या आसपास खुर्च्या भरल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर कार्यकर्ते त्यांचे भाषण सोडून बिर्याणीवर ताव मारण्यासाठी निघून गेले. त्यामुळे अजित पवारांवर रिकाम्या खुर्थ्यांसमोर भाषण ठोकण्याची वेळ ओढावली.
वाशी रेल्वे स्थानक परिसरातील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अल्पसंख्याक संमेलन आज पार पडले. या संमेलनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येतील, असे अपेक्षित धरून आयोजकांनी मोठी तयारी केली होती. सुमारे दोन हजार किलो चिकण आणण्यात आले होते. शेकडो पातेल्यांमधून ही बिर्याणी तयार करण्यात आली. मात्र कार्यकर्त्यांचा ओघ कमी दिसल्याने अनेक टोप रिकामे ठेवण्यात आले.
अजित पवार यांचे भाषण सुरू झाल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी सभा मंडपातून काढता पाय घेतला आणि ते भोजन कक्षाकडे आले. पवार यांचे भाषण सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी बिर्याणीवर मनसोक्त ताव मारला. कार्यकर्ते भोजण कक्षात आल्यामुळे ज्या ठिकाणी सभा सुरू होती तेथील खुर्च्या मात्र रिकाम्या झाल्या.
ज्या विद्याथींनींनी कौटुंबिक आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडले आहे. त्या मुलींच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च सरकार करणार आहे, असे आमिषही अजित पवार यांनी यावेळी अल्पसंख्याक समाजाला दाखवले. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, नजीब मुल्ला, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत आदी उपस्थित होते.
अशी उडाली झुंबड
बिर्याणी खाण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली. त्यामुळे अजित पवारांचे भाषण सुरू असतानाच कॅटरर्सला बिर्याणीचे काऊंटर सुरू करावे लागले. कार्यकर्त्यांनी केलेल्या रेटारेटीमुळे भोजन कक्षाचा एक दरवाजाही तुटला. राष्ट्रवादीचा हा मेळावा जरी फ्लॉप गेला असला तरी बिर्याणीची खमंग चर्चा आज नवी मुंबईत दिवसभर सुरू होती.