जागतिक आदिवासी दिनाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

359

जागतिक आदिवासी दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या शौर्याचे, कार्याचे, त्यागाचे स्मरण करुन राज्यातील जनतेला आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डोंगर-दऱ्या, रानावनात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी निसर्गसंपदेचं संरक्षण, संवर्धन तर केलेच. त्याचबरोबरीने प्रथा-परंपरा, लोककला, लोकसंस्कृतीच्या माध्यमातून देशाचे सांस्कृतिक वैभव समृद्ध केले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवांचा गौरव केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, आदिवासी समाजबांधवांना त्याग, शौर्य, देशप्रेमाचा गौरवशाली इतिहास आहे. राष्ट्रउभारणीत आदिवासी बांधवांचे मोठे योगदान आहे. समाजाने कायमंच निसर्गाशी नाते जपले आहे. हे नाते जपत असताना आधुनिक काळाचा वेध घेऊन आदिवासी युवक आज उच्च शिक्षण घेवून जीवनाच्या अनेक क्षेत्रात महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, ही आनंदाची, अभिमानाची बाब आहे. आदिवासी समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यानिमित्ताने दिला आहे.

आदिवासी बांधवांच्या हक्क, अधिकारांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध – संजय राठोड

जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्टला सर्वत्र साजरा केला जातो. या दिनानिमित्त वनमंत्री संजय राठोड यांनी राज्यातील आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात वनमंत्री राठोड म्हणतात, राज्यातील वनविभागाचा मंत्री या नात्याने आदिवासी समाजाला वन तसेच वनक्षेत्र याबाबत दिलेले संविधानिक हक्क व अधिकार यांचे संरक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. वनविभागांतर्गत विविध योजना व कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सामुहिक वन हक्क व्यवस्थापनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचा विभागाचा मानस आहे.आदिवासी भागात राज्य योजनेतून तसेच जिल्हा योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास,वृक्ष व फळबाग लागवड,वन्यजीव व जैवविविधतेचे संरक्षण याबाबत वनविभाग काम करीत आहे. या योजनांचा आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या