
आधी विरोधी पक्षनेते असताना ‘ओला दुष्काळ’ची मागणी करायची. मग आता सत्तेवर असताना ‘ओला दुष्काळ’ का जाहीर केला जात नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. तसेच अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला असून, राज्य सरकारने तातडीने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले पाहिजेत, अशी मागणीही पवार यांनी केली. पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आपल्या शैलीत सत्ताधारी
शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
कसे बोलावे हे मंत्र्यांना शिकवावे…
राज्यातील मंत्री, आमदार यांनी केलेल्या विधानांचा संदर्भ घेत अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. ‘सत्ताधारी पक्षाचे आमदार पन्नास खोक्यांची चर्चा करीत एकमेकांवर आरोप करीत आहेत. एक मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही दारू पिता का? असा प्रश्न करीत आहे, ‘आनंद शिधा’ विषयावर एका मंत्र्याने दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत असते, असे विधान केले आहे. यावरून हे सरकार नागरिकांच्या प्रश्नांवर असंवेदनशील असल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यांच्या मंत्री अािण आमदारांना कधी, कसे आणि काय बोलावे याचे प्रशिक्षण दिले पाहिजे’, असा टोलाही पवार यांनी लगावला.
प्रकल्पांसाठी राज्य सरकारने आक्रमक व्हावे
राज्यातील एअर बस प्रकल्प हा गुजरातला गेल्याच्या चर्चेवर पवार म्हणाले, ‘यापूर्वी तीन प्रकल्प राज्याबाहेर गेले. ते आमच्यामुळे गेले, कोणीतरी टक्केवारी मागितली असे चुकीचे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. वास्तविक असे प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नयेत आणि राज्यात रोजगार निर्मिती करणारे प्रकल्प आणण्यासाठी राज्य सरकारने आक्रमक होणे गरजेचे आहे. उगाच यांच्यामुळे, त्यांच्यामुळे गेले अशी विधाने करण्यात काहीच अर्थ नाही. असे आरोप-प्रत्यारोप करीत राहिलो तर राजकीय नेत्यांची विश्वासार्हता राहणार नाही.’





























































