आमदार रिव्हॉल्व्हर काढतो आणि गोळीबार करतो, कायदा व सुव्यवस्था आहे की नाही?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न असताना ते सोडविण्याऐवजी शिंदे गटाकडून ठिकठिकाणी राजकीय संघर्ष सुरू आहे. एक आमदार उठतो रिव्हॉल्व्हर काढतो आणि गोळीबार करतो, राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? गृह मंत्री काय करत आहेत? पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही आणि राज्याच्या हिताचेही नाही, असे खडेबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले.

गणेशोत्सव उत्साहात साजरा झालेला असतानाच गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान शिंदे गटाकडून हाणामारी करण्याचा प्रयत्न झाला. याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. कुणीपण उठतो आणि रिव्हॉल्व्हर काढतो. हे काय बिहार-यूपी आहे का? मला या राज्यांची बदनामी करायची नाही. पण सत्ताधारी पक्षाचाच आमदार असा वागायला लागला तर कसे होणार? पोलिसांनी काय भूमिका घ्यायची? आपल्या राज्यात हे असे कधीच नव्हते असे सांगत अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षातील लोकांच्या वाढत्या अरेरावीबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांवर गर्दी जमविण्याची वेळ येते हे दुर्दैव

पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय सभेला जर सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावले जात असेल तर महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडत आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस सभेला गेल्या तर तेथील मुलांनी काय करायचं, ती कुठे जाणार? त्या मुलांकडे लक्ष कोण देणार? गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी आज पैठण येथील सभेवरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

या सरकारमध्ये गांभीर्य हा प्रकारच नाही

मध्यंतरी एका आमदाराने तंगडय़ा तोडण्याची भाषा केली होती. त्या वेळी विधानसभेत या वर्तनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या आमदारांना समज द्यावी, असे सांगितले होते. परंतु तरीसुद्धा तोच प्रकार सुरू आहे. अजूनही त्यांच्या तोंडातून ठोकाठोकीची भाषा ऐकायला मिळते. या सरकारमध्ये गांभीर्य हा प्रकारच  राहिलेला नाही, असा संताप पवार यांनी व्यक्त केला. मुंबईत आमदाराने गोळीबार केल्याचा आरोप होत आहे. ते खरं की खोटं हे लोकांना कळलं पाहिजे, असे ते म्हणाले.

मी नाराज नाही, स्टँप पेपरवर लिहून देऊ का?

राष्ट्रवादीच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अजित पवार यांना भाषण करण्याची संधी दिली नाही. यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर सोमवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना – मी नाराज नाही, हे स्टँप पेपरवर लिहून देऊ का?  मी वॉशरूमलाही बाहेर जायचं नाही का? असे आपल्या खास स्टाईलमध्ये उत्तर पत्रकारांकडून वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावर दिले.